KDMC तही वाझे, महापालिकेतील वाहनचालकच करायचा अधिकाऱ्यांसाठी वसुली; जमवली कोट्यवधींची माया
कल्याण डोंबिवली मनपा अ प्रभागात कार्यरत असलेले वाहनचालक विनोद लकेश्री यांच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ठाणे : सरकारी नोकरदारांचे अनेक कारनामे समोर येत असतात, भ्रष्टाचार आणि लाचखोरीची अनेक प्रकरणे यापूर्वीच समोर आली आहेत. त्यामध्ये, संबंधित विभागाकडून त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. आता, महापालिकेतील वाहनचालकाने मोठी माया जमवल्याचं तपासात समोर आलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा (KDMC) वाहन चालकासह तीन जणांवर खंडणीचा गुन्हा (Crime news) दाखल करण्यात आला आहे. हा वाहनचालक जोर जबरदस्तीने बांधकाम व्यावसायिकांकडून पैसे उकळण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांना तक्रार करण्याच्या नावाखाली खंडणीची मागणी करत होता. विनोद मनोहर लकेश्री असं या वाहन चालकाचं नाव असून पालिकेतील अधिकाऱ्यांसाठी तो वसुलीचं काम करत असल्याची सुत्रांची माहिती आहे.
राज्यात सध्या सचिन वाझे प्रकरण गाजत असून चक्क गृहमंत्र्यांसाठीच वसुलीचं काम करत असल्याचा आरोप माजी पोलीस अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणावरुन राजकारण तापलं असतानाच आता कल्याण डोंबिवली मनपातही अशीच घटना समोर आली आहे. येथील अ प्रभागात कार्यरत असलेल्या वाहनचालक विनोद लकेश्री याच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या इमारती अनधिकृत आहेत. या इमारतींवरील कारवाई थांबवण्यासासाठी 41 लाखांच्या रक्कमेसह चार सदनिका वाहनचालकाने जबरदस्तीने ताब्यात घेतल्याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या दाखल गुन्ह्यात कल्याण डोंबिवली वाहन चालकासह 4 खंडणीखोरांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी वाहन चालक विनोद लकेश्रीला निलंबित केले आहे. विशेष म्हणजे या वाहन चालकाकडे करोडो रुपयांची माया असल्याचीही माहिती आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद मनोहर लकेश्री हा वाहन चालकाने महापालिकेत चालक पदावर असतानाही गेल्या 7 वर्षांपासून वाहन चालवलंच नसल्याची माहिती आहे. कार्यालयातील कागदोपत्री हजेरी लावून अधिकाऱ्यांच्या वसुलीचे काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खंडणीचा गुन्हा दाखल आरोपी
विनोद मनोहर लकेश्री केडीएमसी वाहन चालक, प्रशांत शिंदे,महेश दत्तात्रय निंबाळकर, विलास शंभरकर आणि परेश शहा अशा पाच जणांवर खंडणीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा
उसने पैसे दिले नाहीत, बीडच्या नाथरा गावात गोळीबार; परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल