रेल्वेच्या सीआयबी आणि आरपीएफची मोठी कारवाई, एक कोटी रकमेसह 9 लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त
Kalyan News : हैदराबादहून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून एक कोटी रकमेसह 9 लाख रूपये किंमतीची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. कल्याण रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली.
Kalyan News Update : कल्याण रेल्वे स्थानकावर देवगिरी एक्स्प्रेस मधून तब्बल एक कोटी रकमेसह नऊ लाख रूपये किंमतीची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. रेल्वेच्या सीआयबी (गुन्हे गुप्तचर शाखा ) आणि आरपीएफने ही कारवाई केली असून या प्रकरणी पाच संशयसितांना ताब्यात घेतले आहे. गणेश मरिबा भगत, मयूर वालदास भाई कापडी, नंदकुमार वैध, संजय मनिककामे, चंदू माकणे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
हैदराबादहून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यवधी रुपयांच्या अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या आरपीएफ व सीआयबी अधिकार्यांना मिळाली होती. त्यानुसार आरपीएफ आणि सीआयबीच्या पथकाने या माहितीच्या आधारे सापळा रचत कल्याण रेल्वे स्थानकावर देवगिरी एक्स्प्रेस मधून पाच संशयित इसमाना ताब्यात घेतलं. कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे एक कोटी एक लाख 55 हजार रुपयांची रोकड आणि नऊ लाख 14 हजार रुपये किंमतीची सोन्याची बिस्किटे आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपींनी आपण कुरियर कंपनीसाठी काम करत असून कुरियर पोचविण्यासाठी आल्याची माहिती दिली. परंतु, आरोपींकडून तपास यंत्रणांना अशी माहिती देण्यात येत असली तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड आणि सोन्याच्या तस्करी ही गंभीर बाब आहे. त्यामुळे पोलीस आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
रेल्वे मार्गाने होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी रेल्वेचे सर्व विभाग सक्रीय झाले आहेत. त्यामुळे रेल्वे गाड्यांची कसून चौकशी केली जात आहेत. त्यातच हैदराबादहून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती अधिकार्यांना मिळाली होती. त्यामुळे सीआयबी निरीक्षक सुनील शर्मा, उपनिरीक्षक जीएस एडले यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचला. यावेळी आरपीएफचे निरीक्षक प्रकाश यादव आणि तुकाराम आंधळे यांना तीन वेगवेगळ्या बोगी मध्ये पाच जण संशयितरित्या प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. या पाच जणांना सामानासह ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता एका पार्सलमध्ये 9 लाख 14 हजार रुपये किंमतीची सोन्याची बिस्किटे असलेले 3 बॉक्स तर इतर चौघांच्या पार्सलमध्ये एक कोटी एक लाख 55 हजार रुपयांची रोकड असल्याचे आढळून आले.
कुरियर कंपनीसाठी काम करत असल्याची माहिती
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आपण वेगवेगळ्या कुरियर कंपन्यासाठी नांदेड, औरंगाबाद, परभणीमध्ये काम करत असून मस्जिद बंदर मधील संबधित कुरिअर कंपनीच्या कार्यालयात हे पार्सल पोचविण्याचे काम आपल्याला देण्यात आल्याची माहिती या पाच जणांनी दिली. दरम्यान पुढील चौकशीसाठी ठाणे आयकर विभागाने या पाचही जणांना ताब्यात घेतले असून रेल्वेच्या आरपीएफ विभागाने त्यांच्याकडील रोकड आणि सोने जप्त केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली.