(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kalyan Crime : गाड्या विकल्या मात्र पैसे दिलेच नाही, कर्मचाऱ्यांकडून शोरुम मालकाला 48 लाखांचा गंडा
Kalyan Crime : तीन कर्मचाऱ्यांनी आपसात संगनमत करत शोरुममध्ये आलेल्या पंधरा गाड्या परस्पर विकल्या. शिवाय या गाड्यांचे पैसे शोरुममध्ये दिले नाहीत. अशाप्रकारे शोरुम मालकाची 48 लाख रुपयांना फसवणूक केली.
कल्याण : कर्मचाऱ्यांनीच शोरुम मालकाला तब्बल 48 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसानी अकाऊंटंट पदावर काम करणाऱ्या एक महिलेसह एक तरुणाला अटक केली आहे. सुजित जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून या शोरुमचा मॅनेजर तुषार तांबे फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कल्याण पश्चिम परिसरात एका कारचे शोरुम आहे. या शोरुममध्ये एक्स्चेंज झालेल्या गाड्या त्यांच्या दुसऱ्या शोरुममध्ये विक्रीसाठी ठेवल्या जातात. या शोरुममध्ये मॅनेजर पदावर तुषार तांबे, सेल्समन पदावर सुजित जाधव, एक महिला अकाऊंटंट विभागात कार्यरत आहेत. या तिघांनी आपसात संगनमत करत शोरुममध्ये आलेल्या पंधरा गाड्या परस्पर विकल्या. शिवाय या गाड्यांचे पैसे शोरुममध्ये दिले नाहीत. दोन ते तीन महिन्यानंतर शोरुम मालकाच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ चौकशी केली. चौकशीमध्ये या तिघांनी मिळून 48 लाख रुपयांचा अपहार केल्याचे लक्षात आलं.
यानतंर शोरुम मालकाने तातडीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार महात्मा फुले पोलीस ठाण्यात तुषार तांबे, सुजित जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुजित जाधवसह एका महिलेला अटक केली. तुषार तांबे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
"शोरुमच्या आऊटलेटमध्ये जुन्या गाड्यांची खरेदी विक्री केली जायची. जुन्या गाड्यांची विक्री करताना या ठिकाणाहून ज्या गाड्यांची विक्री झालेली नाहीत, त्यांची विक्री झाल्याचा रिपोर्ट पाठवला जायचा. त्याचसोबत अकाऊंट विभागाला त्या गाड्यांची विक्री झालेली नाही असा अहवाल पाठवला जात असे. अशाप्रकारे दोन परस्परविरोधी अहवाल पाठवून 48 लाखांची फसवणूक केली आहे. एकूण 15 गाड्यांची रक्कम शोरुममध्ये जमा झालेली नाही. महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. एकूण तीन आरोपींचा यात सहभाग आहे. त्यापैकी दोघांना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे. सध्या तपास सुरु आहे," अशी माहिती महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी दिली.