धक्कादायक... कल्याण स्थानकात तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न
कल्याण स्थानकावर एक तरुण रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहत उभा होता. एका इसमानं त्याला तलवारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला.
कल्याण : कल्याण स्थानकावर धक्कादायक प्रकार घडला. मंगळवारी रात्री 11 वाजता लोकलची वाट पाहत फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशाला थेट तलवारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली. जवळच असलेल्या दुसऱ्या प्रवाशानं आरडा-ओरडा केल्यानं फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशाला धाक दाखवणाऱ्या चोरट्याचं नाव निखिल वैरागर असं आहे. त्यानं या आधी किती प्रवाशांना अशा प्रकारे लुटलंय याचा शोध सध्या रेल्वे पोलीस घेत आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच या घटनेमुळं प्रवाशांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.
आंबिवली येथे राहणारा तरुण 29 ऑगस्ट रोजी 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावरील 2 नंबर फलाटावर पुलाच्या खाली लोकलची वाट पाहत उभा होता. इतक्यात पुलावरून त्याच्या जवळ आलेल्या निखिल वैरागर या तरुणानं आपल्या शर्टाच्या आत लपवून ठेवलेली तलवार काढली आणि तो तरुणाजवळ गेला. या तलवारीचा धाक दाखवत जवळ असलेले पैसे आणि मोबाईल दे नाहीतर ठार मारिन, अशी धमकी त्यानं त्या प्रवासी तरुणाला दिली. मात्र त्या प्रवाशाच्या सुदैवानं जवळच फलाटावर लोकलच्या प्रतिक्षेत उभ्या असलेला आणखी एक प्रवासी तलवार बघून पुढे सरसावला आणि बचावासाठी त्यांनं आरडा ओरड केला. आरडा ओरडा ऐकून ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तिथून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या निखील वैरागर याला ताब्यात घेतलं. कल्याण जीआरपीमध्ये निखीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Pune Crime : धक्कादायक! झोपाळा खेळताना गळफास, पिंपरी-चिंचवडमध्ये 8 वर्षीय मुलीचा मृत्यू
- नवऱ्याने न विचारता पाणीपुरी आणल्याने भांडण, बायकोची विषारी रसायन पिऊन आत्महत्या
- वसईत अल्पवयीन अनाथ मुलीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
- पंढरपुरामधील नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरणातील आरोपी तब्बल साडेतीन वर्षांनी गजाआड
- बहिणीला पळवून नेल्याच्या राग, अल्पवयीन भावाकडून प्रियकराची हत्या, अमरावतीतील खळबळजनक घटना