पंढरपुरामधील नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरणातील आरोपी तब्बल साडेतीन वर्षांनी गजाआड
पंढरपुरामधील नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरणातील आरोपींना तब्बल साडेतीन वर्षांनी गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. आतापर्यंत या प्रकरणातील 27 पैकी 24 जणांना अटक करण्यात आलं आहे.
पंढरपूर : नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरणातील दोन फरार संशयित आरोपींना पंढरपूर पोलिसांनी थेट कर्नाटकमधील म्हैसूर येथून शिताफीनं अटक केली. तब्बल साडेतीन वर्ष या आरोपींनी पोलिसांना गुंगारा दिला होता. पंढरपूर शहरातील भरवस्तीत असलेल्या भागात 18 मार्च 2018 रोजी नगरसेवक संदीप दिलीप पवार यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. संदीप पवार हे स्टेशन रोड वरील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले असताना अज्ञात लोकांनी कोयत्यानं वार करून आणि गोळ्या झाडून त्यांचा निघृण खून केला होता.
सरजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुंडांच्या टोळीनं हा खून केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. या खून प्रकरणातील एकूण 27 आरोपींपैकी 24 आरोपींना पोलिसांनी अटक करून या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती.
उर्वरित फरार तीनपैकी सुनील वाघ आणि संतोष देवमारे हे दोघे आरोपी कर्नाटकमधील म्हैसूर येथे नाव बदलून आणि वेषांतर करून राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेनुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी म्हैसूर येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला. काल (शनिवारी) या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी गेले साडे तीन वर्षे पोलिसांना गुंगारा देत आधी कोल्हापूर, बेळगाव आणि नंतर कर्नाटकातील म्हैसूर येथे राहत होते. या आरोपींची आपल्या कुटुंबाशीही थेट संबंध न ठेवल्याने त्यांचा माग काढणे पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. मात्र उशिरा का होईना पोलिसांनी मोक्का मधील या आरोपीना जेरबंद केल्यानं आता या हत्या प्रकरणात केवळ एका आरोपीचा शोध बाकी राहिला आहे.
दरम्यान, पंढरपूर नगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक संदीप दिलीप पवार (38) याच्यावर शहरातील स्टेशन रोडवरील एका हॉटेलात जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. चार ते पाच तरुणांनी पवार यांना गोळ्या घाल्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान सोलापूर येथे पवार यांचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :