Jalgaon Crime : पतीच्या निधनानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी जन्मदात्रीने आपल्या मुलांनाच विक्रीला काढलं
Jalgaon Crime : पतीच्या निधनानंतर मुलांचा सांभाळ करणं अवघड जात असल्याने एका महिलेने आपली मुलेच विक्रीला काढल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात समोर आल्याने खळबळ उडाली आहे
![Jalgaon Crime : पतीच्या निधनानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी जन्मदात्रीने आपल्या मुलांनाच विक्रीला काढलं Jalgoan crime news After the death of husband the woman sold her children to make ends meet Jalgaon Crime : पतीच्या निधनानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी जन्मदात्रीने आपल्या मुलांनाच विक्रीला काढलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/72acabae41fabcda42b4588fb2625f7e1659092499_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalgaon Crime : पतीच्या निधनानंतर आपल्या सात मुलांचा उदरनिर्वाह करणं अवघड जाऊ लागल्याने एका जन्मदात्या मातेने थेट मुलांनाच विक्रीला काढल्याची धक्कादायक प्रकार जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर इथे समोर आला आहे. अमळनेर शहरात मोलमजुरी करुन आणि भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेने आपल्या अडीच वर्षाच्या मुलाची 15 हजार रुपयांमध्ये विक्री केली. तर इतर दोन मुलांच्या विक्रीचा व्यवहार सुरु होता. पतीचं कोरोना महामारीमध्ये (Corornavirus Pendamic) निधन झालं. नंतर आपल्या सात मुलांचा सांभाळ करणं या महिलेला अवघड जात होतं. आपल्या मुलांची उपासमार होऊ नये यासाठी तिने हा प्रकार केल्याचं पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासत समोर आलं आहे.
कोरोना काळात पतीच्या निधनानंतर चरितार्थाचे कुठलेही साधन नसल्याने या महिलेने आपल्या सर्वात लहान अडीच वर्षाच्या मुलाची एकाला विक्री करण्याचा निर्णय घेतला. या मुलाला 15 हजार रुपयांना विकलं. तर आणखी दोन मुलांच्या विक्रीचा व्यवहार सुरु होता. मुलाचा व्यवहार अठरा हजारांना तर मुलीचा व्यवहार 25 हजार रुपयांना होणार होता. मात्र याबाबत अमळनेर पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने इतर दोन मुलांचा व्यवहार उधळून लावला तर पंधरा हजार रुपयात विक्री केलेल्या अडीच वर्षाच्या मुलाचा देखील पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्याला सुखरुप परत आणलं. या मुलांची बाल निरीक्षण गृहात तर महिलेची निराधार महिला संगोपन विभागात रवानगी करण्यात आली आहे.
ही महिला फूटपाथवर राहणारी आहे. महिलेच्या पतीच्या निधनानंतर सात मुलांचे पालनपोषण करण्यासाठी महिलेला भीक मागण्याची पाळी आली. मात्र भीक मागूनही मुलांचे पोट भरु शकत नव्हती. त्यामुळे महिलेने तिच्या सातपैकी एका अडीच वर्षांच्या मुलाला विकल्याची तसंच दोन मुलांचा व्यवहार सुरु असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली. तपासाची चक्रे फिरवत अमळनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन मुलांना ताब्यात घेऊन अडीच वर्षाच्या मुलालाही सुखरुप परत आणलं. या तिघांसह इतर मुलांना पालनपोषणासाठी जळगाव शहरातील बालसुधारगृहात दाखल करण्यात आलं आहे. तर महिलेला जळगावातील शासकीय आशादीप या वसतिगृहात दाखल करण्यात आलं, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. या घटनेत कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)