Ratnagiri Crime : स्वप्नाली सावंत खून प्रकरणात राजकीय मंडळींची चौकशी, पोलिसांनी पतीच्या मोबाईलचा सीडीआरही मागवला
रत्नागिरीतील ऐन गणेशोत्सवात गाजलेल्या स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात आता काही राजकीय मंडळींची देखील चौकशी केली जाणार आहे.

Ratnagiri Crime : रत्नागिरीतील (Ratnagiri) ऐन गणेशोत्सवात गाजलेल्या स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात (Swapnali Sawant Murder Case) आता काही राजकीय मंडळींची देखील चौकशी केली जाणार आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी स्वप्नाली यांचा पती भाई सावंत याच्या मोबाईलचा सीडीआर मागवला होता. त्यानुसार स्वप्नाली सावंत खून प्रकरणात काही राजकीय मंडळींची देखील चौकशी होणार आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी डीएनए चाचणीच्या अहवालाची देखील प्रतिक्षा आहे.
साधारण दीड महिन्यापूर्वी रत्नागिरीतील स्वप्नाली सावंत हत्या प्रकरण चांगलंच गाजलं होतं. शिवसेनेच्या पंचायत समितीच्या सभापती राहिलेल्या स्वप्नाली सावंत ऐन गणेशोत्सवात गायब झाल्या. त्यानंतर त्यांच्या पतीने स्वप्नाली गायब असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. पण, याच प्रकरणात पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांच्या पतीसह आणखी दोघांना अटक केली. यावेळी शिवसेनेचा उपतालुका प्रमुख राहिलेल्या स्वप्नाली यांचा पती भाई सावंतने स्वप्नालीची हत्या केल्याची कबुली दिली. स्वप्नाली यांचा पहिल्यांदा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह घराच्या मागील बाजूला जाळण्यात आला. पण, पोलिसांनी यावेळी घटनास्थळावरुन पुरावे देखील मिळाले आणि भाई सावंतचा सारा डाव उधळला गेला. सुरुवातीला भाई सावंतने तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर मात्र त्याने दिलेली गुन्ह्याची कबुली पाहता कोल्ड ब्लडेड मर्डर अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून ऐकू येऊ लागली. दरम्यान, कौंटुबिक वादातून भाई सावंतने स्वप्नाली सावंत यांचा खून केला होता. दरम्यान आता या साऱ्या प्रकरणात काही राजकीय मंडळींची देखील चौकशी होणार आहे.
का होणार चौकशी?
स्वप्नाली सावंत खून प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. या संपूर्ण प्रकरणाता छडा लावण्यासाठी, यामध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असलेले यावेळी समोर येणे गरजेचं आहे. त्यासाठी पोलिसांनी भाई सावंत याच्या मोबाईलचा सीडीआर मागवला आहे. त्यानुसार सध्या पोलिस प्रत्येकाची चौकशी करत आहेत. भाई सावंत राजकारणात सक्रीय होता. त्यामुळे त्याचे राजकीय मंडळींशी देखील संभाषण झालेले आहे. या चौकशीदरम्यान पोलीस प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाऊन चौकशी करत आहेत. त्यामुळे सध्या काही राजकीय मंडळींची देखील चौकशी केली जात आहे.
डीएनए अहवालाची प्रतिक्षा
मुख्य बाब म्हणजे स्वप्नाली सावंत यांच्या हत्येनंतर पोलिसांनी डीनए चाचणी देखील केली आहे. खून झालेल्या ठिकाणाहून काही हाडं, दात देखील पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार डीनए चाचणी केली गेली. पण, या चाचणीचा अहवाल येण्यास महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार हा तपास सुरु आहे. त्यानुसार आता प्रत्येक बाबी यामध्ये तपासून पाहिल्या जात आहेत.
संबंधित बातमी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
