Ratnagiri Crime : धक्कादायक! आधी गळा आवळून खून, त्यानंतर मृतदेह जाळून 18 ते 20 पोती भरुन राख समुद्रात फेकली
Ratnagiri Crime : स्वप्नाली सावंत खून प्रकरणात धक्कादायक खुलासेआरोपींनी मृतदेहाची राख 18 ते 20 गोणींमधून समुद्रात फेकलीघटनास्थळावरुन पोलिसांनी हाडं ताब्यात घेतली गळा आवळून झाल्यानंतर स्वप्नाली यांचा मृतदेह घराच्या मागच्या बाजूला जाळला
Ratnagiri Crime : सध्या रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात चर्चा सुरु आहे ती स्वप्नाली सावंत यांच्या हत्येची (Swapnali Sawant Murder Case) पंचायत समितीच्या माजी सभापती राहिलेल्या स्वप्नाली सावंत या मागिल 31 ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख राहिलेले त्यांचे पती सुकांत ऊर्फ भाई सावंत यांनी त्या हरवल्याची तक्रार 2 सप्टेंबर रोजी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दिली होती. पण,स्वप्नाली सावंत यांचा पत्ता काही लागत नव्हता. अखेर चार ते पाच दिवस चाललेल्या तपासाअंती पोलिसांनी स्वप्नाली यांच्या आईच्या तक्रारीवरुन सुकांत सावंत यांना अटक केली. त्यानंतर समोर आलेलं वास्तव धक्कादायक असंच म्हणावे लागेल. पोलिसांच्या सात टीमने केलेल्या तपासाअंती सुकांत सावंत यांच्यासह आणखी दोन जणांना अटक केली गेली आहे. सध्या हे तिघेही पोलीस कोठडीत असून 19 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पण, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पतीला अटक केल्याने खळबळ उडाली आहे. तपासातून आणि मिळालेल्या पुराव्याच्या आधारे स्वप्नाली यांना खून पतीने केला असल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पण, पोलीस मात्र आणखी पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचं रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी सांगितलं. सध्या पोलिसांकडे सुकांत सावंत यांच्याविरोधात पुरावे आहेत. पण, आणखी काही गोष्टी आणि पुरावे आम्ही गोळा करत असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
कोल्ड ब्लडेड मर्डर!
स्वप्नाली यांचा केलेला खून हा शांत डोक्याने आणि विचारपूर्वक तसेच नियोजित असाच होता हे हळूहळू स्पष्ट होत आहे. स्वप्नाली या रत्नागिरी शहरात राहत होत्या. 'गणेशोत्सवानिमित्त स्वप्नाली आपल्या गावी गेल्या. त्यावेळी संधी साधत त्यांचा गळा आवळून दिवसाढवळ्या खून करण्यात आला. खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह झाकून ठेवण्यात आला. त्यानंतर तपास भरकटावा या उद्देशाने त्यांचा मोबाईल फोन घेत रत्नागिरी ते लांजा असा प्रवास देखील केला गेला. खून केल्याच्या संध्याकाळी त्यांचा मृतदेह घराच्या आवारात पेट्रोल आणि भाताचा पेंढा याचा वापर करत जाळला गेला. त्यानंतर ही संपूर्ण राख 18 ते 20 गोण्या भरुन समुद्रात फेकली गेली. ज्या ठिकाणी मृतदेह जाळला गेला त्या ठिकाणी देखील कोणतीही पुरावा राहणार नाही याची देखील काळजी घेतली गेली. पण, पोलिसांकडे याबाबतचे पुरावे आहेत. घटनास्थळावरुन हाडं देखील मिळाली आहेत. त्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर त्याबाबतची अधिक माहिती मिळेल' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाय, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यामध्ये तांत्रिक बाबी, तसेच इतर बाबींचा देखील विचार सुरु आहे. सर्व काही आत्ताच सांगणे योग्य होणार नाही असं देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी यावेळी सांगितलं.
हत्येमागे कारण काय?
स्वप्नाली सावंत आणि त्याच्या पतीमध्ये वाद होते. काही वेळा हे वाद टोकाला देखील गेले होते. त्याबाबतच्या तक्रारी देखील केल्या गेल्या होत्या. दरम्यान, याच कौटुंबिक वादातून स्वप्नाली सावंत यांचा खून केला असावा अशी माहिती देखील यावेळी पोलिसांनी दिली आहे.