पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नगरसेविकेच्या मुलाने रचला हत्येचा कट; पाच आरोपींना अटक
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नगरसेविकेच्या मुलाने इतर पाच जणांसोबत हत्येचा कट रचला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र हलवत पाच आरोपींना अटक केली.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी एकाची हत्या झाली. यात पोलिसांनी तपासाची चक्र हलवत पाच आरोपींना अटक केली. त्यानंतर या हत्येचा कट भाजप नगरसेविका सुनीता तापकीर यांचा मुलगा राज तापकिरने रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली. राजने त्याचा चुलत मेहुणा शुभम नखातेला फोन करून बोलावलं आणि त्यानंतर सहा आरोपींनी कोयत्याने वार करून त्याची हत्या केलेली आहे. त्यामुळे वाकड पोलीस राज तापकिरचा शोध घेत आहेत.
शुभम नखाते आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्यात वडापावची गाडी लावण्यावरून वादंग निर्माण झालं. तेंव्हापासून ते एकमेकांसमोर आले की, त्यांची नजरेला नजर भिडायची. त्यातून अनेकदा किरकोळ भांडणं ही झाली, पण प्रकरण जागीच मिटायचं. अनेक महिन्यांपासून हे नित्यनियमाचं झालं होतं. बुधवारी (19 ऑगस्ट) दुपारी साडेचारच्या सुमारास या दोघांत पुन्हा भांडणं झाली, पुन्हा एकमेकांना मारहाण झाली. तेंव्हा शुभमने ज्ञानेश्वरला जीवे मारण्याची धमकी दिली. मग ज्ञानेश्वरही चवताळला, त्याने पाच साथीदारांच्या कानावर ही बाब टाकली. प्रकरण भाजप नगरसेविका सुनीता तापकीरांचा मुलगा राजपर्यंत पोहोचले. राजने रात्री आठच्या सुमारास शुभमला फोन केला आणि प्रकरण मिटवण्यासाठी तापकीर चौकातील धोंडिराज मंगल कार्यालयात बोलावलं. राज चुलत दाजी असल्याने शुभमच्या मनात कोणती शंका उपस्थित होण्याचं कारण नव्हतं. त्यामुळे शुभम साडे आठच्या सुमारास धोंडिराज मंगल कार्यलयात आला. मात्र तिथं आल्यानंतर पुन्हा वादंग झाला आणि शुभमवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमचा जागीच मृत्यू झाला होता.
वाकड पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळ गाठलं. तपासाची चक्र वेगाने हलली आणि अवघ्या तासाभरात ज्ञानेश्वर पाटीलसह तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्याकडून अधिकची माहिती घेत इतर दोघांना असं पाच आरोपींना जेरबंद करण्यात आलं. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच वरील घटनाक्रम समोर आला. आरोपींनी आणि मयताच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार, भाजप नगरसेविका सुनीता तापकीरांचा मुलगा राज तापकीरने हत्येचा कट रचल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. राज हा भाजप नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा जावई देखील आहे. वाकड पोलीस राजचा शोध घेत आहेत.
दरम्यान, मयत शुभम नखाते वर पॉस्को अंतर्गत एक गुन्हा दाखल आहे. तर हत्येचा कट रचण्याचा आरोप असलेल्या राजवर ही याआधी मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सायबर गुन्ह्याचं नेटवर्क 'जामताडा'; झारखंडच्या या चार शहरांमध्ये दिलं जातंय सायबर क्राईमचं ट्रेनिंग
धक्कादायक! मुलीशी लग्न न लावून दिल्याच्या रागातून मुलीच्या बापाचा तब्बल 8 वर्षानंतर खून
बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवलं; पारनेर मधील घटना