आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; एफडीए निरीक्षकाची नागपुरात आत्महत्या
Nagpur Crime : एका हॉटेलच्या खोलीत स्वतः तयार केलेले विषारी द्रव्य पिऊन या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नागपूर: शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, आयएएस-आयपीएस अधिकारी (IAS-IPS Officers) होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने आत्महत्या (Suicide) केली आहे. एका हॉटेलच्या खोलीत या अधिकाऱ्याचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने सर्व प्रकार समोर आला. मृत अधिकारी परभणी (Parbhani) जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवाशी असून, ते मित्राला भेटायला नागपूरला आले होते. त्यानंतर एका हॉटेलच्या खोलीत त्यांनी स्वतः तयार केलेले विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आएएएस किंवा आयपीएस न झाल्याची खंत सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) लिहून ठेवली आहे. भम सिद्धार्थ कांबळे (वय 25, वर्मानगर, गंगाखेड, परभणी) असे मृतक अधिकाऱ्याचे नाव आहे.
शुभम कांबळे परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या वर्मानगर येथील रहिवासी होता. शुभम हा एका मित्राच्या भेटीच्या बहाण्याने 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये आला. त्याला 311 क्रमांकाची खोली देण्यात आली होती. सोमवार, 27 नोव्हेंबर रोजी शुभमबाबत विचारणा झाल्याने मॅनेजर बावणे यांनी रूमबॉयसह त्याच्या खोलीवर जाऊन आवाज दिला. दार आतून बंद होते आणि हाकेला प्रतिसादही मिळत नव्हता. त्यामुळे मॅनेजर बावणे यांना संशय आल्याने त्यांनी गणेशपेठ पोलिसांना सूचना दिली. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दार उघडले असता शुभम हा बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेला होता आणि खोलीत रसायनाचा उग्र वास येत होता. खोलीत रसायनाच्या चार-पाच बाटल्या पडलेल्या होत्या. तसेच, पोलिसांच्या हाती एक सुसाइड नोट लागली. या प्रकरणी स्थानिक पोलिसांत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.
सुसाइड नोटमध्ये काय?
'आयएएस' आणि 'आयपीएस' न झाल्याने मनात खंत आहे. आत्महत्येला आपण स्वतःच जबाबदार आहोत, असा मजकूर चिठ्ठीत लिहून ठेवलेला आहे. पोलिसांनी शुभमला उपचारार्थ मेयो इस्पितळात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर याची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. दरम्यान, याची माहिती मिळताच शुभमच्या कुटुंबातील सदस्यांना देखील धक्का बसला आहे. तर, शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह परभणी जिल्ह्यात गावकडे घेऊन जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: