मोठी बातमी: जात-धर्म न पाहता बालपणीच्या मैत्रिणीसोबत लगीनगाठ बांधली, जातअभिमान बाळगणाऱ्याने बापाने जावयालाच संपवलं
आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला होता.
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे आंतरजातीय विवाहासाठी (marriage) शासनाकडून आर्थिक मदत केली जाते, मानवता हाच एक धर्म मानून सामाजिक समानता व समतोल साधण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असतो. मात्र, जातीव्यवस्था आणि धर्मव्यवस्था आजही मूळापर्यंत रुजल्याचं चित्र समाजात दिसून येते. विशेषत: आपल्या कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नावेळी ही जाती व धर्मव्यवस्था प्रकर्षणाने जाणवते. काही वर्षांपूर्वी सैराट नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यातूनही ऑनर किलींगवर प्रकाश टाकण्यात आला होता. परजातीच्या मुलासोबत लग्न केल्याचा राग मनात धरुन आपल्याच मुलीचा व जावयाचा खून केल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. आता, छत्रपती संभाजीनगरमध्येही (Sambhajinagar) अशीच ऑनर किलींगचा घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये, मुलीच्या चुलत भावाने व वडिलांनी अमित नामक तिच्या नवऱ्याचा खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून (police) आरोपीचा शोध सुरू आहे.
आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला होता. शहरातील इंदिरानगरमध्ये 14 जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके हा तरुण गंभीर जखमी झाला होता. पोटात व छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी घाटीच्या अतिदक्षता विभागात अमितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमितचे तिच्या बालपणीची मैत्रिण विद्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांचा धर्म वेगळा असल्याने कुटुंबीयांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. पण, घरच्यांचा विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. पुढे अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने 2 मे रोजी ते घरी परतले. मात्र, विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारले नव्हते. तर, याउलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते.
आपल्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग विद्याच्या वडिलांना व चुलता भावाच्या डोक्यात होता. याच रागातून विद्याचे वडील आणि तिच्या चुलत भावाने 14 जुलै रोजी अमितवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमित खाली कोसळला, त्याच्या पोटात खोलवर वार घुसल्यामुळे तेव्हापासूनच त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र, 12 दिवसानंतर अमितशी मृत्यूशी सुरू असलेली झुंज गुरुवारी उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. या ऑनर किलिंग च्या घटनेने संभाजीनगरशहर हादरून गेलं आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी वडील गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही हे दोघेही सध्या फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येतआहे.
हेही वाचा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2024 | शुक्रवार