(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : सूर्यटोला जळीतकांडातील आरोपी किशोर शेंडेंला फाशी; सासरा, पत्नी आणि मुलाला जिवंत जाळलं
Gondia Crime News : आरोपी किशोर शेंडेंने सासरा, पत्नी आणि मुलाला जिवंत जाळलं होतं. याप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.
गोंदिया : गोंदियाच्या सूर्यटोला जळीत कांडातील आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वाचा निकाल दिला आहे. आरोपी किशोर शेंडे याने मध्यरात्री सासरा, पत्नी आणि मुलाला जिवंत जाळले होते. गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर कॉन्फरमेशन करिता हायकोर्टात जाणार असुन तिथुन ही सजा अंमलात येणार असल्याची माहिती वकील विजय कोल्हे यांनी दिली आहे.
सूर्यटोला जळीत कांडातील आरोपीला फाशीची शिक्षा
गोंदिया जिल्ह्यातील सूर्याटोला येथे माहेरी आलेल्या पत्नी, 5 वर्षीय मुलगा आणि सासर्याला तिरोडा येथील आरोपी किशोर शेंडे याने मध्यरात्री येऊन जिवंत जाळले होते. ही घटना 14 फेब्रुवारी 2023 ला घडली होती. या प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. हे प्रकरण गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होते. अखेर या प्रकरणी आज 9 मे 2024 ला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
नेमकं प्रकरण काय?
या घटनेत सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलाने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ते 90 टक्के भाजले होते. घटनेनंतर तात्काळ रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. मुलाचीही मृत्यू झाला. त्यानंतर जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर गंभीर असल्याने तिला उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आलं. या घटनेत पोलिसांनी प्राथमिकरित्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून फरार जावई किशोर शेंडे याच्या अटकेसाठी शोध सुरू केला होता.
महिला, पाच वर्षीय मुलासह, वृद्ध वडिलांचा मृत्यू
रुग्णालयात उपचारादरम्यान गंभीर भाजलेल्या अवस्थेतही पीडिता आरती शेंडेने पती किशोर शेंडे याने त्यांच्या झोपडीला आग लावल्याचं जबाबात सांगितलं होतं. आरती, तिचा पाच वर्षांचा मुलगा जय आणि तिचे अर्धांगवायू झालेले वडील देवानंद यांच्या हत्येप्रकरणी गोंदिया न्यायालयाने सोमवारी किशोरला दोषी ठरवलं होतं. आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी 9 मे यांनी याप्रकरणी निकाल देत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा छळ
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर शेंडे हा चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करायचा, त्याच्या अत्याचाराला कंटाळून ती गेल्या एक वर्षापासून गोंदियातील सूर्यटोला येथे आपल्या मुलासोबत तिच्या माहेरी राहत होती. आरतीही गोंदियातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होती.