Gondia News: नवनीत कंपनीच्या प्रश्नसंचाचे झेरॉक्स काढून विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Gondia News: शैक्षणिक अभ्यासक्रमातील शिक्षण साहित्य पुरविणाऱ्या नवनीत कंपनीच्या प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स काढून त्यांची विक्री करणाऱ्या झेरॉक्स दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
Gondia News गोंदिया : शैक्षणिक अभ्यासक्रमातील शिक्षण साहित्य पुरविणाऱ्या नवनीत कंपनीच्या प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स काढून त्यांची विक्री करणाऱ्या झेरॉक्स दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई (Gondia Police) केली आहे. कॉपीराईट अधिनियम उल्लंघन प्रकरणी गोंदियाच्या (Gondia News) रामनगर पोलिसांनी शुक्रवार 16 फेब्रुवारीच्या रात्री ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी प्रश्नसंचांचे मायक्रो झेरॉक्स आणि झेरॉक्स मशीन असा 1 लाख 45 हजार 300 रुपयांचा माल जप्त केला आहे. कॉपीराईट अधिनियम 1957 सुधारित अधिनियम 1984 आणि 1994 च्या कलम 51, 63, 65 अन्वये रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
कॉपीराईट अधिनियम उल्लंघनप्रकरणी कारवाई
राज्यात शैक्षणिक सत्र 2023-24 च्या बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. अशात सर्वत्र कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याचा निर्धार संबंधित यंत्रणेने घेतला आहे. अशातच शैक्षणिक साहित्य पुरविणाऱ्या नवनीत प्रकाशनचे नवनीत 21 अपेक्षित प्रश्नसंच दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी महत्त्वाचे ठरतात, सोबतच त्यांची मागणी देखील अधिक आहे. ही बाब लक्षात घेता रामनगर परिसरातील काही झेरॉक्स दुकानदार या प्रश्नसंचांचे मायक्रो झेरॉक्स काढून त्यांची विक्री करीत असल्याची माहिती कंपनीचे रीजनल सेल्स मॅनेजर किशोर प्रभाकर सेलुकर (58, रा. आर्णी रोड, यवतमाळ) यांना मिळाली होती. नवनीत एज्युकेशन लिमिटेड कंपनी ही महाराष्ट्र राज्य कॉपीराईट कायदा 1957 चे कलम 63 अन्वये प्राधिकृत असून, दुसऱ्या कुणालाही नवनीत 21 अपेक्षित प्रश्नसंच प्रकाशित करण्याचा अधिकार नाही. त्यानुसार प्रश्नसंचांचे झेरॉक्स करून ते विकणे हा कायद्याने गुन्हा असल्याने नवनीत एज्युकेशन लिमिटेड कंपनीच्या वतीने या बाबत पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली.
लाखोंचा मुद्देमाल जप्त
या तक्रारीवरून रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना कायदेशीर कारवाई करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी आणि शहर निरीक्षकांना तक्रारदार किशोर सेलूकर यांना मदत करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून ही कारवाई केली आहे. ज्यामध्ये पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केली असता, त्यांना एन.एम.डी. कॉलेज रोडवरील शिवाणी झेराॅक्सचे मालक रविकांत हरिप्रशाद जायस्वाल (60), रानी झेराॅक्सचे मालक उज्ज्वल तुषारकांत जायस्वाल (34) आणि लक्की झेराॅक्सचे मालक चंद्र रमेश जोशी (34) हे दुकानात इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाकाळात उपयोगी येणाऱ्या नवनीत 21 अपेक्षित प्रश्नसंचाचे अवैधरीत्या मायक्रो झेरॉक्स प्रती काढून विक्री करीत असताना आणि बाळगतांना मिळून आले. त्यावरून पोलिसांनी पुढील कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. सोबतच या कारवाईमध्ये प्रश्नसंचांचे मायक्रो झेरॉक्स आणि झेरॉक्स मशीन असा 1 लाख 45 हजार 300 रुपयांचा माल देखील जप्त केला आहे.