(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एटीएम कार्ड क्लोन करुन पैसे काढणाऱ्या परदेशी नागरिकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
पोलिसांना 2 लाख 9 हजार 320 रूपये किमतीची कार्ड क्लॉनिंग करण्याकरता लागणारे साहित्य सापडले. तसेच 157 एटीएम सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले.
मुंबई : एटीएम कार्ड क्लोन करून पैसे काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा सराईत गुन्हेगार भारतीय नागरिक नसून रोमेनियन नागरिक आहे ज्याचं नाव नेडेलकू व्हॅलेंटाईन एवोनेट (वय 38) असे आहे. नेडेलकू व्हॅलेंटाईन एवोनेटवर मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. ज्यामुळे त्याचा शोध मुंबईचे पोलिस घेत होते.
कसा अडकला नेडेलकू व्हॅलेंटाईन एवोनेट पोलिसांच्या जाळ्यात
19 जुलै रोजी ओशिवरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्री त्यांच्या हद्दीत लोखंडवाला परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक परदेशी नागरिक बँकेच्या एटीएममध्ये संशयास्पदरित्या वावरताना दिसला, त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर थोडा संशय आला. पोलीस त्याच्याजवळ गेले त्याला विचारणा केली. मात्र त्याचे हावभाव पाहून आणि त्याच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्द मागील भीती पोलिसांना जाणवली. म्हणून पोलिसांना त्याची झडती घेतली. ज्यामध्ये पोलिसांना त्याच्याकडून 9 एटीएम कार्ड सापडले.
पोलिस त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि त्याची चौकशी सुरू केली. ज्यामध्ये पोलिसांना कळलं की सापडलेले नऊ एटीएम कार्ड हे त्याचे नव्हते. तसेच एटीएम क्लोन करून पैसे काढण्याचा गुन्हा करत असल्याची कबुली नेडेलकू व्हॅलेंटाईन एवोनेटने दिली. ही सगळी माहिती पोलिसांसमोर येतात पोलिसांच्या भुवया उंचावल्या आणि त्यांनी तात्काळ या प्रकारात युद्धस्तरावर तपास सुरू केला.
त्यानंतर पोलिसांनी नेडेलकू व्हॅलेंटाईन एवोनेट घराची झडती घेतली. ज्यात पोलिसांना 2 लाख 9 हजार 320 रु किमतीची कार्ड क्लॉनिंग करण्याकरता लागणारे साहित्य सापडले. तसेच 157 एटीएम सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले. तसेच नेडेलकू व्हॅलेंटाईन एवोनेटकडून सापडलेल्या एकूण 166 एटीएम कार्डची तपासणी केल्यावर त्यामधील 72 एटीएम कार्डमध्ये विविध बँकेच्या एटीएम कार्ड क्लोनिंग केल्याचे पोलिसांना निष्पन्न झालं.
नेडेलकू व्हॅलेंटाईन एवोनेट हा मुंबईतील साकी विहार कॉम्प्लेस साकीनाका येथे राहणारा होता. त्याच्यावर मुंबईतील दहिसर पोलीस स्टेशन, डी एन नगर पोलीस स्टेशन, डोंबिवली पोलीस स्टेशन, विनोबा भावे नगर पोलिस स्टेशन, एम आर ए पोलीस स्टेशन,वांद्रे पोलिस स्टेशन, नवघर पोलीस स्टेशन अशा विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी जप्त केलेली मालमत्ता
3 लॅपटॉप, 166 एटीएम कार्ड, कार्ड स्वॅपिंग रिडर डिव्हाईस, 2 नोट काउंटिंग मशीन, 4 मोबाईल फोन, 08 यूएसबी कनेक्टड हिडन कॅमेरा, मेमरी कार्ड्स आणि कार्ड क्लोनिंगकरता लागणारी अशी एकूण 2 लाख 9 हजार 320 रुपयांची साधनसामुग्री पोलिसांनी जप्त केली आहे.तसेच याच्या बरोबर याच्या अजून कोणी साथीदार आहेत का याचाही शोध पोलीस घेत आहे. ज्या नागरिकांची अशी फसवणूक झाली असेल तरी तात्काळ पोलिसांना संपर्क करण्यास आव्हान सुद्धा पोलिसांनी केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडाळे यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक गुन्हे रघुनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक तुषार सावंत, पोह साटम,पोह बागवे, पोना माने,पोशि बारसिंग,पोशि सोयंके,पोशि शेख,पोशि सपकाळ ह्या पथकाद्वारे बजावण्यात आली आहे.