चार वर्षांपूर्वी पत्नीनं कॅन्सरनं जीव सोडला; आता पतीनं चार दिव्यांग मुलींसह आयुष्य संपवलं, उध्वस्त कुटुंबाची करुण कहाणी!
Delhi Crime : हतबल झालेल्या बापानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. साधारणतः चार वर्षांपूर्वी दिव्यांग असलेल्या चौघींच्या आईचा कन्सरनं जीव घेतला. पत्नीच्या मृत्यूनंतर बापानं चौघींची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
Delhi Crime : नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी पत्नीनं कॅन्सरनं (Cancer) जीव सोडला, त्यानंतर चार अपंग मुलींच्या काळजीनं व्याकूळ झालेल्या बापानं कुटुंबाचा संपूर्ण भार स्वतःच्या खांद्यावर घेत, गाडा पुढे हाकण्यास सुरुवात केली. सुतारकाम करून जमेल तसा, तो चौघींचा सांभाळ करत होता. पण अखेर तो थकला आणि त्यानं चार दिव्यांग मुलींसह स्वतःचंही आयुष्य संपवलं. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. दिल्लीतील रंगपुरी भागात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दिल्लीत (Delhi Crime) घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. हतबल झालेल्या बापानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. साधारणतः चार वर्षांपूर्वी दिव्यांग असलेल्या चौघींच्या आईचा कन्सरनं जीव घेतला. पत्नीच्या मृत्यूनंतर बापानं चौघींची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. कसाबसा, जमेल तसा तो चौघींचा सांभाळ करत होता. अखेर हतबल होऊन त्यानं त्या चौघींसकट स्वतःचंही आयुष्य संपवून टाकलं आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला.
नेमकं घडलं काय?
दिल्लीतील रंगपुरी भागात एका पित्याने आपल्या चार मुलींसह आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी सर्वांचे मृतदेह ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील सुताराचं काम करत होते आणि त्यांच्या पत्नीचं साधारणतः एक वर्षापूर्वी कर्करोगानं निधन झालं. मुली अपंग असल्यानं त्यांना चालताही येत नव्हतं त्यामुळे वडील चिंतेत होते.पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांची काळजी आणखी वाढली. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, चौघींचा हतबल झालेला बाप 24 तारखेला घरात जात असल्याचं घराजवळच्या एका सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. घरात गेल्यानंतर वडील आतून दरवाजा लावून घेतात. चार दिव्यांग मुलींपैकी एक मुलगी आंधळी असल्याची माहिती मिळाली आहे. तर, उर्वरित मुलींबाबत पोलीस माहिती गोळा करत आहेत.
पोलिसांकडून कसून तपास सुरू
शुक्रवारी सकाळी 10 वाजता दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद असल्याचं आढळून आलं. त्यानंतर दिल्ली अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि दरवाजा तोडण्यात आला. खोलीत पाचही जणांचे मृतदेह पडले होते आणि जवळच सल्फासचं उघडं पाऊच सापडलं. याशिवाय खोलीच्या डस्टबिनमध्ये ज्यूसचे टेट्रा पॅक आणि पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळाचा तपास दिल्ली एफएसएल, सीबीआय एफएसएल आणि सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी केला.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हे नक्कीच आत्महत्येचं प्रकरण असल्याचं दिसत आहे. पण या पाच जणांनी एकत्र असं पाऊल कसं उचललं? यासाठी किती काळ प्लॅन करत होते? वडिलांनी मुलींना विष पाजून आत्महत्या केली का? याचा सखोल तपास केला जाणार आहे. या प्रकरणामागील खरं कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समजेल. चारही मुलींच्या पोटात आणि गळ्यात लाल रंगाचा कपडा बांधला होता. पहिल्या खोलीच्या डबल बेडवर चार मुलींचे मृतदेह पडलेले होते आणि दुसऱ्या खोलीत हिरालाल यांचा मृतदेह आढळून आला आणि पाचही मुलींच्या तोंडातून पांढरा फेस येत होता.