(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyber crime: सावधान! सायबर गुन्हेगारी वाढतेय, 'या' तीन मेसेजला रिप्लाय दिल्यामुळे होऊ शकते फसवणूक
सध्या सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या ट्रिक वापरून लोकांची फसवणूक केली जात आहे. अनोळखी मेसेज किंवा कॉलवरून कुणीही पर्सनल माहिती विचारत असेल, तर शेअर करू नका.
Cyber crime: सध्या सायबर गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढत आहे. त्यामुळे अनेकांची ऑनलाईन फसवणूक होते. हे सायबर गुन्हेगार किंवा हॅकर्स अनेकांच्या बँक डिटेल्स मिळवून आर्थिक फसवणूक करतात. यासंबंधित अलीकडेच चेक पाँईंट रिसर्चने एक रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये सायबर क्राईम 18 टक्क्यांनी वाढली आहे. हे सायबर गुन्हेगार (Cyber crime) अनेक लोकांना आणि सरकारांना वेगवेगळ्या प्रकारे टार्गेट करून त्रास देताना दिसून येतात. हे सायबर गुन्हेगार किंवा हॅकर्स अॅण्ड्रॉईड मोबाईल यूजर्स असो किंवा आयफोन युजर्स असो अशा दोन्हा प्रकारच्या लोकांना टार्गेट करत आहेत. सायबर तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, अनेक लोकांना मोबाईलवर तीन प्रकारचे धोकादायक मेसेज पाठवून फसवणूक करतात. या प्रकारचे तुम्हालाही मेसेज येत असतील, तर याकडे वेळीच दुर्लक्ष करा. अन्यथा तुमचं बँक खाते (Bank Account) काही सेकंदात रिकाम होऊ शकतं. याविषयी सविस्तर जाणून घेऊया...
Cyber crime : या तीन मेसेजपासून सांभाळून राहा
1. हे सायबर गुन्हेगार (Cybercrime) तुम्हाला एखादा इमोशनल मेसेज पाठवतात आणि फसवणूक करतात. जसे की, तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे, तुमचा मुलगा सहलीवर गेला आहे आणि त्याला अर्जंट पैशांची गरज आहे. अशा प्रकारची काहीही कारणे देऊन आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या मेसेजला इमोशनल होऊन रिप्लाय देऊ नका.
2. हे सायबर गुन्हेगार एखादी ट्रिक वापरून तुमची पर्सनला माहिती विचारू शकतात. जसे की, तुमच्या बँक खात्याची माहिती आणि ओटीपी नंबरची माहिती मागणे इत्यादी.
3. अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज किंवा कॉल यांना प्रतिसाद देऊ नका. जर तुम्ही एखाद्या वेळेस कॉल स्वीकारला, तर समोरील व्यक्ती काय माहिती विचारत आहे याची काळजीपूर्वक तपासणी करा.यानंतरच अॅक्शन घ्या. तुम्हाला असा कोणताही फोन किंवा मेसेज आला, तर त्याकडे लगेच दुर्लक्ष करा आणि याबद्दल जवळच्या पोलिस स्टेशनला रिपोर्ट करा. तसेच तुमच्या ओळखीतील मित्रांनाही माहिती द्या. कारण इतर लोकही सतर्क राहतील.
हे सायबर गुन्हेगार लोकांशी सायकॉलॉजिकल माईंड गेम खेळतात आणि सायबर चोरी करण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे या गुन्हेगारांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका आणि आपली पर्सनल माहिती चुकूनही शेअर करू नका. तुमची पर्सनल माहिती कुटुंबातील सदस्यांव्यतीरिक्त इतर कुणालाही शेअर करू नका अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.