Dada Bhuse : दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार, नाशिकमधील 50 विद्यार्थ्यांसोबत बसमधून मंत्रालयाकडे रवाना
Dada Bhuse : दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील 50 विद्यार्थ्यांसोबत ते बसमधून मंत्रालयाकडे रवाना झाले आहेत.
Dada Bhuse नाशिक : राज्याच्या मंत्रिमंडळात दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शालेय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी संस्था, समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्री दादा भुसे मंत्र्यालयात पदभार स्वीकारणार आहेत.
मंत्री दादा भुसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत विद्यार्थ्यांशी संवाद साधलाल. यानंतर नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या 50 विद्यार्थ्यांना मुंबईला सोबत घेऊन दादा भुसे बसमधून मंत्रालयाकडे रवाना झाले आहेत.
चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न
यावेळी दादा भुसे म्हणाले की, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी नाशिकवर सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन दिले आहे. ज्या संवेदनेने त्यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्याजवळ दिली आहे, मला माहित आहे की, हे एक मोठं आव्हानात्मक काम आहे. परंतु सर्व विभाग झपाटून काम करेल. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून आम्ही येणाऱ्या काळात चांगल्यात चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी म्हटले आहे.
शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करणार
ते पुढे म्हणाले की, शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरविणार आहे. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले, त्यामुळे दुखवटा असल्याने मी आतापर्यंत पदभार स्वीकारला नाही. नाशिक जिल्ह्यात आदर्श शाळांची संख्या 200 च्या वर आहे. स्वच्छता गृह, शाळा दुरुस्ती, ई - शाळा सुरू करणे, असे अनेक उपक्रम मी राबवणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.
दादा भुसेंनी दिलेला शब्द केला पूर्ण
यावेळी बसमधील विद्यार्थिनी म्हणाली की, मागच्या वर्षी आम्हाला दादा भुसे यांनी शब्द दिला होता की, मी तुम्हाला मुंबईला मंत्रालयात नेणार आहे. त्यांनी आज तो शब्द पूर्ण केला. योगायोगाने आता ते शिक्षण मंत्री देखील झाले आहेत त्यामुळे त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला इतक्या लहान वयात ते मंत्रालयात नेत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार, असे तिने म्हटले.
आणखी वाचा