'आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ', सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, पुण्यातील घटना
सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या झाल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. पुण्यातील निखिल धोत्रे याने रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली

पुणे - सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या झाल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर - गोखलेनगर येथे सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे याने रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते. त्यानंतर सुसाईड नोट देखील सापडली आहे. या नोटमध्ये सासूरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिलं आहे.
निखिलनं आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी. आई तू काळजी करू नकोस मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे असे चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. निखिलचे एक वर्षापूर्वी लग्नं झालं होतं.
























