Buldhana News : कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार; 13 सदस्यांसह 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक गैरव्यवहार करणे समितीच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच अंगलट आले आहे. लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 13 सदस्यांसह 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Buldhana News बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 13 संचालकांसह दोन कर्मचाऱ्यांवर विविध कलमान्वये खामगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व संचालकांनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायदा करून घेतला. यात सम्यक साक्षी सेक्युरिटी अँड लेबर कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांवर दबाव आणला होता. सुरक्षारक्षक पुरवलेले नसतानाही देयकांवर सह्या घेऊन पदाचा गैरवापर करून जवळपास 32 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे. हे प्रकरण उजेडात येताच कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी कलम 420, 409, 477 (अ ) आणि 34 भारतीय दंड विधान नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सर्व संचालक आणि कर्मचारी फरार झाले असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.
13 सदस्यांसह 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक गैरव्यवहार करणे समितीच्या सभापती, सचिव, कर्मचारी आणि संचालकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. सुरक्षा रक्षक कामावर नसताना एकमेकांशी संगनमत करून तब्बल ३२ लाखांची खोटी बिलं काढणे समितीतील 13 संचालकांसह दोन कर्मचाऱ्यांना भोंवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, संचालक गणेश संभाजी माने, गणेश मनोहर ताठे, श्रीकृष्ण महादेव टिकार, विलाससिंग सुभाषसिंग इंगळे, प्रमोद श्यामराव चिंचोळकर, संजय रमेश झुनझुनवाला, मंगेश नामदेव इंगळे, सचिन नामदेव वानखेडे, हिंमत रामा कोकरे, सुलोचना श्रीकांत वानखेडे, वैशाली दिलीप मुजुमले, सचिव गजानन आमले, कर्मचारी प्रशांत विश्वपालसिंह जाधव, निरिक्षक विजय इंगळे, रोखपाल गिरीश सातव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर सभापतींसह गुन्हा दाखल झालेले संचालक, रोखपाल, निरिक्षक आणि इतर संशयित आरोपी नॉटरिचेबल असून अनेकजण फरार झाले आहेत.
विज कोसळून कांदाचाळ भस्मसात, दोन बैलांचाही जागीच मृत्यू
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या वादळी पावसाने कहर केला असून सायंकाळी आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. खामगाव जवळील चीतोडा गावाजवळ असलेल्या शेतातील कांदा चाळीवर विज कोसळून लागलेल्या आगीत शेतकऱ्याचा कांदा जळून भस्मसात झालाय. तर या कांदाचाळच्या बाजूला गोठ्यात बांधलेल्या दोन बैलांचाही या आगीत होरपळून मृत्यू झालाय. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या