(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जुगाराच्या नादात वयोवृद्ध महिलेची निर्घृण हत्या, घराला आग लावून लाखोंचे दागिनेही लंपास; पोलिसांनी मात्र काही तासात हत्येचं गूढ उकललं
Bhiwandi Crime News : ऑनलाईन जुगार खेळाच्या नादात कर्जबारी झालेल्या तरुणाने कर्ज फेडण्यासाठी हत्येचा (Crime News) कट रचल्याचे समोर आले.
Bhiwandi Crime News : ऑनलाईन जुगार खेळाच्या नादात कर्जबारी झालेल्या तरुणाने कर्ज फेडण्यासाठी हत्येचा (Crime News) कट रचल्याचे समोर आले. ही घटना भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील भुईशेत गांवचे हद्दीत झाटेपाडा, येथील आरिफ फार्म हाऊस मध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या दिवशी वयोवृद्ध महिलेचा गळा कापुन, अंगावरील तसेच घरातील सोन्याचे दागिने चोरी करुन घराला आग लावुन आरोपी फरार झाला होता. मात्र भिवंडी ग्रामीण तालुका पोलिसांनी (Police) तपासाचे चक्रे जलदगतीने फिरवत आरोपीला अवघ्या 36 तासाच्या आत ठाण्यातील एका लॉजिंग मधून अटक केली आहे. अभिमन्यु गुप्ता असे अटक केलेल्या संशयित आरोपीच नाव आहे. तर सेल्वामेरी अगस्टीन नाडर,(वय 74) असे निर्घृण हत्या झालेल्या वयोवृद्ध महिलेचं नाव आहे.
जुगाराच्या नादात वयोवृद्ध महिलेची निर्घृण हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील भुईशेत गांवचे हद्दीत झाटेपाडा, येथील आरिफ फार्म हाऊसमध्ये मृत सेल्वामेरी अगस्टीन नाडर या वयोवृद्ध महिला ही तिच्या मुलासह राहत होती. दरम्यान, 14 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास तिची कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन राहते घरातील रुममध्ये धारदार हत्याराने गळा कापुन ठार मारले. त्यानंतर तिचे अंगावरील व घरातील सोन्याचे दागिने चोरी करुन, पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने घराला आग लावून आरोपीने पळ काढला होता. याप्रकरणी गावातील पोलीस पाटील कृष्णा जयराम सालकर, (वय 32) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 103(1), 238 प्रमाणे. गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी मात्र अवघ्या 36 तासात हत्येचं गूढ उकललं
दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्याने भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके, यांच्यासह ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, सपोनि श्रीकांत जाधव, किरण मतकर यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला असता, पोलीस तपासात मृत महिलेच्या मुलाकडे दूध डेअरीवर पूर्वी काम करणारा अभिमन्यु हा घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. सतांना गुप्त बातमीदार व तांत्रीक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा अभिमन्यु गुप्ता यानेच केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा पथकाने शोध सुरू केला. तर संशयित आरोपी ठाण्यातील एका लॉजमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी 16 ऑगस्ट रोजी ठाण्यातील कापूरबावडी परिसरात असलेल्या स्पेन्सर हॉटेल व लॉजींगवर सापळा रचुन त्याला ताब्यात घेतलं.
घराला आग लावून लाखोंचे दागिनेही लंपास
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता मृत महिलेच्या मुलाकडे मी कामाला असताना त्यांच्या घरात दागिने असल्याचे माहित होतं. त्यातच मला रमी जुगाराचा नाद लागल्याने ऑनलाईन रमी जुगारात एक ते दीड लाख कर्ज झाल्याने ते कर्ज फेडण्यासाठी महिलेची हत्या करून तिच्या अंगावरील आणि घरातील दागिने घेतले. त्यानंतर हत्येचा संशय येऊ नये म्हणून घराला आग लावून त्या आगीत मृतकचा जळून मृत्यू झाला, असे भासवत पळून गेल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली.
या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांच्याशी संपर्क साधला असता, आरोपीला 17 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले. तर 28 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच संशयित आरोपीकडून मुद्देमाल हस्तगस्त करण्यासाठी अधिक तपास करीत असल्याचेही पोलिसांनी सांगतले.
इतर महत्वाच्या बातम्या