Beed Crime News : गावातील प्रेमप्रकरण, दोघेही लॉजवर गेले अन् भयंकर घडलं; तिला संपवून त्याने स्वतःलाही संपवलं
Beed Crime News : महिलेची हत्या केल्यावर तो गावी गेला आणि शेतात जाऊन त्याने गळफास घेतला. पोलिसांनी या दोनही घटनेंचा पंचनामा करून, पोलीस दफ्तरी नोंद घेतली आहे.
बीड : प्रेम प्रकरणातून महिलेची हत्या (Murder) करणाऱ्या एकाने स्वतः देखील आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यात समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील शिवनेरी लॉजवर एका महिलेचा हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असतानाच आता महिलेची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीने देखील आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. महिलेची हत्या केल्यावर तो गावी गेला आणि शेतात जाऊन त्याने गळफास घेतला. हा प्रकार प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नंदकुमार बन्सिधर वांडेकर (वय 42 वर्ष, दोघेही रा. चिंचाळा, ता. वडवणी) असे महिलेची हत्या केल्यावर स्वतः आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचेही गावात समोरासमोर घर आहे. त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरु असल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 10 वाजता हे दोघेही शिवनेरी लॉजवर पोहचले. यावेळी दोघांमध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत बंद खोलीत वाद झाला. याच वादातून वांडेकर याने महिलेचा गळा आवळल्याचा संशय आहे. तसेच, महिलेची हत्या केल्यानंतर वांडेकर मेडिकलवरून औषधी आणत आहे, असे म्हणून लॉजच्या बाहेर पडला. यावेळी त्याने खोलीला बाहेरून कुलूपही लावले. परंतु, त्यानंतर तो परत आलाच नाही. दरम्यान, बऱ्याच वेळापासून वांडेकर परतला नाही. त्यात सोबतच्या महिलेला देखील त्याने सोबत नेले नाही. त्यातल्या त्यात रूमला बाहेरून कुलूप लावल्याने लॉज चालकाला संशय आला. लॉज चालकाने याची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.
थेट गाव गाठत शेतात जाऊन गळफास घेतला...
दरम्यान, महिलेची हत्या केल्यावर वांडेकर गोळ्या आणण्यासाठी जात असल्याचं सांगून लॉजच्या बाहेर पडला. त्यानंतर त्याने दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला. एकीकडे पोलीस महिलेच्या हत्येचा तपास करत असतानाच वांडेकरच्या आत्महत्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाइकांना बोलावून घेत सर्व पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची नोंद झाली नव्हती.
प्रेम प्रकरणातून हत्या केल्याचा संशय....
पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित मयत महिला आणि आत्महत्या करणारा वांडेकर यांच्यात चांगली ओळख होती असे पोलिसांच्या प्रथमिक माहितीतून समोर आले आहे. दोघांचेही गावात समोरासमोर घर आहे. त्यामुळे प्रेम प्रकरणातून महिलेची हत्या करून त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: