मुंबईतील वाढते बांगलादेशी पोलिसांची डोकेदुखी? कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेत भारतात वास्तव?
Mumbai Crime News : देशात बांगलादेशींची वाढती संख्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशींचा मोर्चा गुजरात आणि मुंबईच्या दिशेने अधिक असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : मुंबईत दहशदवाद विरोधी पथकाने चार बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi Arrested) पकडल्याच्या बातमीने राज्यात चिंतेचे वातावरण आहे. बांग्लादेशी घुसखोरांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता राज्यातील अनेक शहरं ही ज्वालामुखींच्या तोंडवर उभी आहेत, अशी चिंता आता पोलिस व्यक्त करत आहेत. मुंबईत चालू वर्षात 177 बांग्लादेशींना पकडण्यात आले आहे. यातील फक्त 81 बांग्लादेशींना स्वगृही परत पाठवण्यात पोलिसांना यश आले आहे. मागील अडीच वर्षात 692 बांग्लादेशींना पोलिसांनी पकडले आहे. दिवसेंदवस वाढत असलेला हा आकडा लक्षात घेता, सरकारने या प्रश्नाकडे धार्मिक दृष्ट्या न बघता राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न समजून सर्व संशयित वस्त्यांचे सर्वेक्षण हाती घ्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मुंबईत बांगलादेशींची वाढती संख्या पोलिसांची ठरतेय डोकेदुखी?
नुकतीच महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतून चार बांगलादेशींना अटक केली, त्यांच्या चौकशीत यातील दोन बांग्लादेशींनी भारतीय पारपत्राच्या मदतीने लोकसभा निवडणूकीत उत्तर पश्चिम मतदारसंघात मतदान केल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता राजकारणही तापू लागले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर ईशान्य मुंबईत बांगलादेशी मतदानामुळे भाजपचा पराभव झालाची 'एक्स' पोस्ट केली होती. तर दुसरीकडे बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे घुसखोरीचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब असून सरकारने गांभीर्याने पाहात, याच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे.
- मागील अडीच वर्षात 692 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात पोलिसांना यश
- फक्त 169 बांगलादेशींना त्याच्या मायदेशी पाठवण्यात पोलिसांना यश
- चालू वर्षात म्हणजेच जानेवारी ते जून 2024 मध्ये 177 बांग्लादेशी नागरिकांना पकडण्यात यश, त्यातील 81 जणांना स्वगृही बांग्लादेशला पाठवण्यात पोलिसांना यश आले आहे.
- चालू वर्षात जून 2024 पर्यंत 177 बांग्लादेशी नागरिकांन पकडण्यात यश आलं असून आतापर्यंत फक्त 81 बांग्लादेशींना स्वगृही पाठवले आहे.
- 2023 मध्ये 368 बांग्लादेशींना पकडण्यात यश आलं असून यातील 68 बांग्लादेशींना स्वगृही पाठवलं आहे.
- 2022 मध्ये 148 बांग्लादेशींना पकडण्यात यश आलं असून यातील फक्त 21 जणांना स्वगृही पाठवण्यात आलं आहे.
मुंबई आणि गुजरातला बांगलादेशींची पसंती
पोलिस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, असंख्य बांग्लादेशी हे आजही भारतात वास्तव्यास आहेत. कोलकत्ता मार्गे हे बांगलादेशी अवघ्या 30 हजारात सीमा ओलांडून भारतात येतात. कोलकत्तातील स्थानिक गावांमधून यांना सुरूवातीला ओळखपत्र एजंट मार्फत दिली जातात. मात्र, कोलकत्तात कामाची कमतरता आणि पैसे कमी मिळत असल्याने हे बांग्लादेशी मुंबई किंवा गुजरातमधील सूरतची वाट धरतात. मुंबईत शिवडी, मालवणी, मालाड, शिवाजीनगर, मानखुर्द, ट्राम्बे, भिवंडी या भागात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी हे वास्तव्याला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
सध्या बांगलादेशांचा मोर्चा गुजरातकडे
मुंबईत बांगलादेशी कन्स्ट्रक्शन वर्कर्स आणि प्लंबर म्हणून मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तर सध्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी हे गुजरातच्या सूरतमध्येही वास्तव्यास आहेत. गुजरातमध्ये जरीचे काम, सोने-चांदी, डायमंड व्यवसायात ते काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सध्या बांगलादेशींनी आपला मोर्चा गुजरातच्या दिशेने वळवला असल्याचे दिसून येते.
बनावट कागदपत्र बनवत भारतात वास्तव्य
भारतात आलेले हे बांग्लादेशींना यापूर्वी भारतात वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी आणि एजंटची मदत कागदपत्र बनवण्यासाठी घेतात. एका कागदपत्राच्या आधारे इतही महत्वाची कागदपत्र हे बनवून घेतात. 2022 मध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंब्रा येथे केलेल्या कारवाईत 100 बांग्लादेशी नागरिकांकडून बनावट पारपत्र जप्त केली होती. भारतीय पारपत्राला बांगलादेशच्या तुलनेत परदेशात जास्त महत्व आहे. यासाठी हे बांगलादेशी भारतात येऊन मग परदेशात नोकरीसाठी जातात किंवा भारतातच स्थायिक होतात. त्यामुळे भारतात आजच्या घडीला हजारो बांगलादेशी वास्तव्यास असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी 'इमो' अॅपचा वापर
भारतात स्थायिक झालेल्या या बांगलादेशींना ओळखणं हे तितकसं सोपं नाही. बांगलादेश आणि भारतातील पश्चिम बंगालमधील कल्चर हे जवळपास सारखं आहे. मात्र भारतात आल्यावर बांगलादेशात वास्तव्यास असलेल्या त्याच्या घरातल्यांशी संवाद साधण्यासाठी भारतात आलेले बांगलादेशी थेट संपर्क करत नाहीत. तर 'इमो' या अॅपचा वापर करतात, असे सध्याच्या कारवाईतून समोर आले आहे.
कायद्याचा होतोय गैरवापर?
विशेष म्हणजे मुंबईत पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाते. अनेकांकडे बोगस आधारकार्ड असल्याने ते कोर्टात सादर केल्यावर हा बांग्लादेशी कशावरून यावरही प्रश्न उपस्थित केले जातात. न्यायालयात जामिनावर या बांग्लादेशींना मुक्तता मिळते. त्यामुळे जो पर्यंत खटला सुरू रहतो. तोपर्यंत हे बांग्लादेशी न्यायालयाने दिलेल्या अटींचे पालन करत, मुंबईत मुक्त संचार करत असतात. कारण मुंबईत विना परवाना वास्तव्य करणाऱ्यांना परदेशी नागरिकांना ठेवण्यासाठी 'डिटेशन सेंटर' नाहीत. त्यामुळेच अनेक बांग्लादेशी आजही मुंबईत वास्तव्यास आहेत.मुंबईत बांग्लादेशींची वाढती संख्या पोलिसांची डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र आहे.