Alibag : अलिबागमध्ये शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग; पालकांचा संताप, पोलिसात गुन्हे दाखल
Alibag School Girl Molestation : बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला असताना असे कृत्य वारंवार समोर येत आहे. त्यामुळे अशा नराधमांना कडक शासन होणे गरजेचं आहे अशी मागणी पालकांमधून व्यक्त होत आहे.
रायगड : राज्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती सुरूच असल्याचं चित्र असून अलिबागमध्येही अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. अलिबागमध्ये दोन घटनांमध्ये दोन वेगवेगळ्या शालेय मुलींचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर पालकवर्गातून संताप व्यक्त होत असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.
अलिबागमधील एका शाळेत दहावी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थिनीच्या दप्तरात कोणीतरी अश्लील भाषेत चिठ्ठी लिहून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर याच तालुक्यातील चोंढी येथील एका शाळेत शिकणार्या मुलीला एका व्यक्तीने रस्त्यात अडवून तिचा सोबत अश्लील चाळे केल्याची घटना घडली. तसेच तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीला अश्लील शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. या मुलींसोबत विनयभंग झाल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या दोन्ही घटना 26 आणि 28 ऑगस्ट रोजी घडल्या आहेत. याबाबत दोन्ही मुलींनी अलिबाग आणि मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सदर मुलांविरोधात वियनभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, एकीकडे बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला असताना असे कृत्य वारंवार समोरं येत आहे. त्यामुळे अशा नराधमांना कडक शासन होणे गरजेचं आहे अशी मागणी पालकांमधून व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुली, महिला अत्यााचाराची अनेक प्रकरणे महाराष्ट्रासह देशभरात समोर येत आहेत. आता अलिबाग तालुक्यातील या दोन नामांकित शाळांमधील विद्यार्थिनींसोबत घडलेल्या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बदलापूरमध्ये आरोपीला अटक
बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगारानं दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच, शाळा प्रशासनानं माफीनामा जाहीर केला असून मुख्याध्यापकांसह चौघांचं निलंबन करण्यात आलं आहे. बदलापुरात चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतच अत्याचार करण्यात आला. माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर पालकांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त नागरिकांनी एकत्र येत शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं. शेकडो पालक रस्त्यावर चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
ही बातमी वाचा: