पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या; फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
19 एप्रिल रोजी पीडित मुलगी आपल्या बहिणीसोबत देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोटाणपार गावात लग्न समारंभात आली होती.
गोंदिया : जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील गोटानपार येथे धक्कादायक घटना घडली असून अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. येथील एका लग्न समारंभासाठी (marriage) आलेल्या 12 वर्षीय मुलीचे अपहरण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी कुठलेही सबळ पुरावे नसताना, मोठ्या शिताफीने तपासाच्या दिशेला गती दिली. या घटनेचा तपास करुन चार विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून हे चारही अल्पवयीन (विधीसंघर्ष) बालक देवरी तालुक्याच्या चिल्हाटी गावातील रहिवासी आहेत. पोलिसांनी (Police) मुलीच्या मोबाईलचा वापर करुन, व्हॉट्सअप चॅटच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून अखेर आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
19 एप्रिल रोजी पीडित मुलगी आपल्या बहिणीसोबत देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोटाणपार गावात लग्न समारंभात आली होती. त्यावेळी, पीडित मुलीच्या मित्राने तिला आपल्या दुचाकीवर बसवून वडेकसा जंगलात नेले. तिथे असलेल्या 4 मित्रांनी पीडितेवर जंगलात सामूहिक अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करीत तीची हत्या केली. त्यानंतर, घटनास्थळावरुन पळ काढला. 20 एप्रिल रोजी सकाळी पीडितेच्या शोध घेतला असता गावकऱ्यांना पीडित मुलीचा मृतदेह जंगलात आढळला. ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. मात्र, सदर घटनास्थळी मोबाईल नेटवर्क सुद्धा नसल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात मोठी अडचण निर्माण होत होती. अखेर वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांनी 6 विविध पथके तयार करून या घटनेचा मोठ्या शिताफीने तपास केला. अखेर, पीडित मुलीच्या मोबाईलवरुन काही मुलांशी चॅटींग होत असल्याचे समजून आल्याने आणि हत्येची वेळही संबंधित चॅटींगशी निगडीत असल्याने पोलिसानी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली.
पोलिसांच्या तपास अखेर तिच्या मित्रांपैकीच काहींचा समावेश असल्याचे दिसून आले. त्यातून, पोलिसांनी 4 विधीसंघर्ष मुलांना ताब्यात घेत चौकशी केली असता 2 मुलांनी गुन्हा कबुल केला. त्यानंतर, पोलिसांनी कलम 302, 376, 363, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या चारही विधिसंघर्ष बालकांची रवानगी नागपुर येथील बाल सुधार गृहात करण्यात आली आहे.