Salman Khan House Firing : टार्गेट मुंबईतील सलमान खान, प्रॅक्टिस बिहारमध्ये!आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
Salman Khan House Firing : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Salman Khan House Firing : बॉलिवू़डचा दबंग स्टार सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) तपास सुरू आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सलमानच्या घरावर गोळीबार करणारे दोघेजण आहे. तर, दोन जणांनी या हल्लेखोरांना शस्त्रे पुरवल्याचा पोलिसांचा आरोप आहे. आता आरोपींच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईतील वांद्रेमध्ये अभिनेता सलमान खानच्या घरावर आरोपींनी 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. गोळीबाराच्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी 72 तासांमध्ये आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी बिहारमध्ये सराव केला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
बिहारमध्ये केला गोळ्या झाडण्याचा सराव...
बिहारमध्ये 8 गोळ्या झाडून गोळीबाराचा सराव केला असल्याचे आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी दोघेही आरोपी बिहारमधील त्यांच्या गावी गेले होते. या ठिकाणी सागर पालने 4 गोळ्या झाडल्या आणि विकी गुप्ताने 4 गोळ्या झाडत गोळीबार करण्याचा सराव केला.
पंजाबमधून अटक करण्यात आलेले आरोपी सोनू कुमार बिश्नोई आणि अनुजकुमार थापन यांनी पनवेलमधील दोन्ही शूटर्सना 38 गोळ्या आणि 2 पिस्तूल दिले. दोन्ही नेमबाजांनी कधीच गोळ्या झाडल्या नसल्यामुळे दोघेही होळीच्या दिवशी बिहारमधील चंपारण येथे गेले होते.त्या ठिकाणी दोघांनी 8 गोळ्या झाडून पिस्तुल चालवण्याचा सराव केला.
पोलिसांनी सांगितले की, शूटर्सकडे एकूण 38 गोळ्या सापडल्या होत्या, त्यापैकी 17 गोळ्या तापी नदीतून हस्तगत करण्यात यश आले आहे. आरोपींनी सलमान खानच्या घरावर 5 गोळ्या झाडल्या. बिहारमध्ये आरोपींनी 8 गोळ्या झाडल्या. या प्रकरणातील उर्वरित 8 गोळ्यांचा छडा लावण्याचा गुन्हे शाखा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सलमानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे होते आदेश
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी मुंबई पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आलेल्या. मात्र, आरोपींनी 5 गोळ्या फायर केल्यात आणि 17 राऊंड आम्ही जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.