What is Dry Promotion : प्रमोशन झालं तरी कर्मचाऱ्यांचा खिसा रिकामाच, 'ड्राय प्रमोशन' भानगड आहे तरी काय?
सध्या ड्राय प्रमोशनचे प्रमाण वाढळे आहे. त्याच कारणामुळे ड्राय प्रमोशन म्हणजे काय? त्याचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम पडतो, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
मुंबई : एप्रिल महिना संपत आला की कर्मचारी वाट बघतात ती अप्रेजल फॉर्मची. कारण मे महिन्यात कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करून कंपनीतर्फे त्यांना पगारवाढ दिली जाते. पगारात वाढ होणार असल्यामुळे कर्मचारी अप्रेजल फॉर्मची आतुरतेने वाट पाहात असतात. पण पगारवाढीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आजकाल कर्मचाऱ्यांना ड्राय प्रमोशनची फार भीती वाटतेय. सध्या ड्राय प्रमोशनचे प्रमाणही वाढल्याचे पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर हे ड्राय प्रमोशन (What Is Dry Promotion) नेमके काय आहे? कर्मचारी या ड्राय प्रमोशनमुळे चिंतेत का आहेत? हे जाणून घेऊ या...
ड्राय प्रमोशन म्हणजे काय?
नोकरीदरम्यान आपलं प्रमोशन व्हावं असं प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटतं. किंबहुना अनेक कर्मचारी प्रमोशनसाठी वर्षभर मेहनत घेतात. मात्र आजकाल अनेक कर्मचारी हे प्रमोशन झाल्यानंतरही आनंदी नसल्याचं दिसतायत. कारण त्यांना ड्राय प्रमोशनला तोंड द्यावं लागतंय. नोकरी करताना तुम्हाला आणखी मोठी जबाबदारी दिली जाते. तुमचे पदही वाढते. पण पदाच्या तुलनेत किंवा दिलेल्या जबाबदारीच्या तुलनेत तुमचा पगारवाढ होत नाही. यालाच ड्राय प्रमोशन म्हटले जाते. आजकाल अनेक कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीत वाढ होते, तसेच त्यांची पदवाढही होते. पण मनासारखा पगार न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजेच ते ड्राय प्रमोशनची शिकार होतात.
ड्राय प्रमोशनचे प्रमाण वाढले
प्रमोशन झाल्यानंतर कर्मचाऱ्याच्या जबाबदारीत बदल होतो. दर्जाही वाढतो. विशेष म्हणजे प्रमोशन झाल्यामुळे कंपनीतर्फे कर्मचाऱ्याला नवे टार्गेट दिले जाते. म्हणजेच एकंदरीत कामाचा व्याप वाढतो, पण त्या तुलनेत संबंधित कर्मचाऱ्याला योग्य मोबदला दिला जात नाही. त्यामुळेच आजकाल कर्मचारी प्रमोशन होऊनही आनंदी दिसत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ड्राय प्रमोशनचे प्रमाण वाढले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार 2018 साली ड्राय प्रमोशनचे प्रमाण हे 8 टक्के होते. ते आता 13 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
ड्राय प्रमोशनच्या भीतीमुळे कर्मचाऱ्यांत निराशा
पद वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांना वरवर आनंद मिळतो पण पगाराच्या दृष्टीने त्यांच्या हातात निराशाच येते. ड्राय प्रमोशनला बळी पडल्यामुळे आजकाल कर्मचाऱ्यांमध्ये निराशा वाढत आहे. आजकाल कर्मचाऱ्यांना पगारासंदर्भात बोलणी करण्यास फारसा वाव राहिलेला नाही. नोकरकपात आणि नोकऱ्यांची कमी संधी यामुळे कर्मचाऱ्यांना पगाराच्या बाबतीत लवचिकता दाखवावी लागत आहे. आर्थिक अस्थिरतेच्या कारणामुळेही ड्राय प्रमोशनचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये पदोन्नती मिळाल्यामुळे कर्मचारी खुश होईल आणि आपल्याला पैसेही द्यावे लागणार नाहीत, असा विचार कंपन्या करतात. त्यामुळे आता ड्राय प्रमोशन ही कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही स्थिती लवकरात लवकर बदलावी अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा :
पैसे तयार ठेवा! या आठवड्यात येणार तीन महत्त्वाचे आयपीओ, मालामाल होण्याची चांगली संधी!
'या' सहा योजनांत गुंतवणूक केल्यास महिला होतील करोडपती, भविष्यात पैशांची चणचण भासणार नाही!
पीएफ खातेधारकांना मोफत मिळतो 7 लाखांचा जीवन विमा, पण नेमका कसा? जाणून घ्या नियम काय?