TDS Rule : घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही लाभ, बजेटमधील TDS नियमातील 'हा' बदल तुमच्या फायद्याचा
TDS Rule Changes In Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घरभाड्यावरील टीडीएसमधून सूट देण्याची मर्यादा 2.4 लाख रुपयांवरून थेट 6 लाख रुपये केली आहे.

मुंबई : या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घरभाड्यावरील टीडीएसचे नियमही बदलले आहेत. सरकारने घरभाड्यावर टीडीएसमधून सूट देण्याची मर्यादा थेट 2.4 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये केली आहे. अर्थसंकल्पादरम्यान, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, यामुळे टीडीएसच्या कक्षेत येणाऱ्या व्यवहारांची संख्या कमी होईल. या नव्या नियमाचा जास्त फायदा कोणाला होणार, भाडेकरू की घरमालक? याची माहिती घेऊ
घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही फायदा
समजा तुम्ही तुमचे एक घर वार्षिक 2.4 लाख रुपये भाड्याने दिले आहे. आतापर्यंत भाडेकरू टीडीएस कापून तुम्हाला भाडे देत असत. आता तुम्हाला टीडीएस न कापता भाडे भरावे लागणार आहे. यामुळे तुम्हाला भाड्याने मिळणारी रक्कम वाढणार आहे. यामुळे घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही फायदा होईल. कारण TDS वरील सूट मर्यादा 2.4 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये करण्यात आली आहे.
भाडेकरूंना मोठा दिलासा मिळणार आहे
किंबहुना गेल्या काही वर्षांत घरांचे भाडे झपाट्याने वाढले आहे. यापूर्वी भाडेकरूला 20,000 रुपयांच्या मासिक भाड्यावर टीडीएस कापून घ्यायचा होता. तर आता 50,000 रुपयांपर्यंतच्या भाड्यावरही तसे करण्याची गरज नाही. यामुळे महानगरांमध्ये भाड्याने राहणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भाड्यावर किती टीडीएस कपातीची परवानगी?
अर्थसंकल्पात केलेल्या नवीन बदलानंतर आता ज्या घरांचे वार्षिक भाडे 6 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, भाडेकरूला टीडीएस कपातीनंतर घरमालकाला भाडे द्यावे लागणार आहे. भाडेकरूला भाड्यावर फक्त 10 टक्के TDS कापण्याची परवानगी आहे. जर घरमालकाकडे स्वतःचे पॅनकार्ड नसेल तर टीडीएसचा दरही 20 टक्क्यांपर्यंत वाढेल.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
