Vijay Mallya Case : घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त रक्कम बँकांनी वसूल केली, विजय मल्ल्याची न्यायालयात याचिका
Vijay Mallya Case : किंगफिशर एअरलाइन्सवर सुमारे 6,200 कोटी रुपयांचे कर्ज होते. परंतु बँकांनी सुमारे 14,000 कोटी रुपये वसूल केल्याचा दावा विजय मल्ल्याने केला आहे.

Vijay Mallya Case : बँकांकडून घेतलेल्या कर्जापेक्षा अधिकची रक्कम आपल्याकडून वसूल करण्यात आली आहे असं सांगत फरार उद्योगपती विजय मल्ल्याने कर्नाटक उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. बँकानी आपल्याकडून वसूल केलेली रक्कम ही कितीतरी पटीने अधिक असल्याचा दावा त्याने त्यात केला आहे. विजय मल्ल्याने त्याच्या वकिलांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे.
विजय मल्ल्याने याचिकेत म्हटलं आहे की, किंगफिशर एअरलाइन्सवर सुमारे 6,200 कोटी रुपयांचे कर्ज होते. परंतु बँकांनी यापेक्षा कितीतरी जास्त म्हणजे सुमारे 14,000 कोटी रुपये वसूल केले आहेत. विजय मल्ल्याच्या मालमत्तेबाबत भारतीय बँका आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) कारवाई करत असताना त्याने हा दावा केला आहे.
बँकांनी आपल्याकडून वसूल केलेली रक्कम ही अधिक असून ती न्यायाच्या तत्वाच्या विरोधात आहे. त्यामुळे बँकांच्या आर्थिक संकटासाठी किंगफिशर एअरलाइन्सला पूर्णपणे जबाबदार धरणे योग्य नाही असा दावा विजय मल्ल्याने केला आहे.
मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याचे बँकांना अधिकार
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नेतृत्वाखालील बँकांच्या एका टीमने लंडन उच्च न्यायालयात विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्यात आधीच यश मिळविले आहे. या निर्णयामुळे बँकांना मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
बँकांनी आतापर्यंत मल्ल्याच्या मालमत्तेवरून कर्जापेक्षा जास्त रक्कम वसूल केली आहे, त्यात मल्ल्याच्या शेअर्सच्या विक्रीचाही समावेश आहे असा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.
मल्ल्याविरोधात तीन मोठे खटले सुरू
मल्ल्याविरुद्ध अनेक कायदेशीर खटले सुरू आहेत, ज्यात भारतातील तीन मोठ्या खटल्यांचा समावेश आहे. यातील एक खटला त्याने केलेल्या तडजोडीच्या सेटलमेंट ऑफरबाबतचा आहे, जो सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याशिवाय मल्ल्यावर आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गतही कारवाई सुरू आहे.
अर्थमंत्री लोकसभेत काय म्हणाले?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच लोकसभेत फरारी उद्योगपती विजय मल्ल्या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली होती. त्यांनी सांगितले की, अंमलबजावणी संचालनालय (ED) मार्फत, बँकांनी विजय मल्ल्याच्या मालमत्तांच्या विक्रीतून 14,131.6 कोटी रुपये वसूल केले आहेत. किंगफिशर एअरलाइन्स (KFA)शी संबंधित कर्ज प्रकरणात ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. त्याची किंमत 6,203 कोटी रुपये होती आणि त्यामध्ये व्याजाचा समावेश आहे.
ही बातमी वाचा:























