(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टाटांच्या थाळीत आता 'चायनीज तडका', मॅगीला टक्कर देण्यासाठी टाटांचा प्लॅन, 'या' कंपनीची करणार खरेदी
आत्तापर्यंत टाटा ग्रुप (Tata Group) तुमच्या ताटात मीठापासून मसाल्यापर्यंत, चहापासून कॉफीपर्यंत सर्व काही देत आहे. आता त्यात तुम्हाला चायनीज फूडची चव मिळणार आहे.
Tata Group : आत्तापर्यंत टाटा ग्रुप (Tata Group) तुमच्या ताटात मीठापासून मसाल्यापर्यंत, चहापासून कॉफीपर्यंत सर्व काही देत आहे. तृणधान्यापासून, कडधान्य या संपूर्ण श्रेणी टाटाच्या 'फूड फॅमिली'चा भाग आहेत. आता त्यात तुम्हाला चायनीज फूडची चव मिळणार आहे. टाटा मार्केट आता 'मॅगी नूडल्स'लाही टक्कर देणार आहे.
या दोन कंपन्यांची करणार खरेदी
टाटा समूह दोन फूड कंपन्यांच्या (Two food companies) अधिग्रहणासाठी करार करण्याच्या जवळ आला आहे. यातील एक कंपनी कॅपिटल फूड्स (companies Capital Foods) आणि दुसरी ऑरगॅनिक इंडिया (Organic India) आहे. कॅपिटल फूड्स हे 'चिंग्स चायनीज' आणि 'स्मिथ अँड जोन्स' सारख्या ब्रँडचे मालक आहे. तर ऑरगॅनिक इंडिया ही कंपनी ग्रीन टी सारखी इतर उत्पादने विकते. फॅब इंडियाने यामध्ये गुंतवणूक केली आहे.
हा सौदा अनेक कोटींचा असणार
टाटा समूहाची कंपनी 'टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड' आपल्या गुंतवणूकदारांकडून कॅपिटल फूड्समधील 75 टक्के हिस्सा खरेदी करत आहे. कॅपिटल फूड्सचे संस्थापक चेअरमन अजय गुप्ता त्यात त्यांचा 25 टक्के हिस्सा कायम ठेवतील. कंपनीचे मूल्यांकन 5100 कोटी रुपये आहे, त्यामुळे हा करार 3,825 कोटी रुपयांमध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणं टाटा समूह ऑरगॅनिक इंडियामधील बहुसंख्य हिस्सा खरेदी करणार आहे. या करारासाठी ऑरगॅनिक इंडियाचे मूल्य 1800 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. टाटा समूह पुढील आठवड्यात या दोन्ही करारांबाबत अधिकृत घोषणा करू शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘मॅगी’ला देणार स्पर्धा
कॅपिटल फूड्सच्या अधिग्रहणानंतर टाटा समूह इन्स्टंट नूडल्स मार्केटमध्ये प्रवेश करेल. ‘स्मिथ अँड जोन्स’ च्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ‘आले-लसूण पेस्ट’, ‘केच-अप’ आणि ‘इन्स्टंट नूडल्स’ समाविष्ट आहेत. यामुळे टाटा बाजारात नेस्लेच्या 'मॅगी' ब्रँडशी स्पर्धा करेल. ‘मॅगी’चा बाजारात 60 टक्के हिस्सा आहे. तर येप्पी, टॉप रामेन, वाई-वाई आणि पतंजली हे या विभागातील मोठे खेळाडू आहेत. ही बाजारपेठ सुमारे पाच हजार कोटी रुपयांची आहे.
महत्त्वाच्या बातम्या: