चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
Grapes Farm : द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकसह राज्यभरातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट होत आहे.
नाशिक : द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकसह (Nashik) राज्यभरातील द्राक्ष बागांच्या (Grape Farm) संख्येत घट होत आहे. नोटबंदीपासून विविध कारणांनी द्राक्ष बागांना फटका बसण्यास सुरुवात झाली. उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत जातोय, त्या तुलनेत उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करताकरता खचलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी (Grape Farmers) द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालविण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच वर्षात साधारणतः 50 हजार क्षेत्रावरील द्राक्षबागा नष्ट झाल्या आहेत.
राज्यात चार ते साडेचार लाख एकरावर द्राक्षबागा आहेत. त्यातून जवळपास तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र निर्यात धोरण, GST सारख्या कराची आकारणी, मजुरांचा तुटवडा, व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक, हमीभाव नसणे, अवकाळी पाऊस, गारपीट अशा एका पाठोपाठ एक येणाऱ्या संकटाच्या मालिकांमुळे युरोप, बांगलादेश, रशियासह जगाच्या वेगवेगळ्या भागात गोडवा पोचविणाऱ्या द्राक्ष बागाच्या संख्येत घट होत आहे. नाशिकसह सांगली, सोलापूर, बारामती, इंदापूर, पुणे या भागातील द्राक्षबागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरकारने वेळीच लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा उजाड
नाशिकची ओळखच मंदिरांची नगरी आणि जिभेला गोडवा देण्याऱ्या द्राक्षांमुळे झाली आहे. याच द्राक्षांमुळे देशाची वाईन कॅपिटल होण्याचा बहुमानही नाशिकच्याच नावावर आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांमुळे नाशिकची ओळख निर्माण झाली आज त्याच शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा उजाड झाल्याचे चित्र आहे. ज्या बागेत डिसेंबर महिन्यात रसरशीत द्राक्ष घडाला लागण्यास सुरवात होत होती. औषध फवारणी करत बागांची निगा राखली जात होती, आज त्याच बागेत काँग्रेस गवत वाढलेले दिसत आहे. ज्या अँगल आणि तारांवर हिरवेगार द्राक्षाचे वेल हवेची झुळूक येताच डोलायचे, त्याच तारांवर आज गंज चढला असून भंगाराच्या भावात विक्री होण्याची वाट बघत आहेत.
द्राक्ष बागेवर संकट
द्राक्ष बागेचा खर्च परवडत नसल्यानं रवी निमसे यांनी मागील वर्षी साडेतीन एकरवरील द्राक्ष बाग तोडली. द्राक्षाच्या ऐवजी त्यांनी टोमॅटोचे पीक घेतले. मात्र त्यातही यश मिळाले नसल्यानं ऐन हंगामात त्यांची द्राक्ष बाग रिकामी आहे. यापुढे कोणते पीक घायचे, या विवंचनेत ते आहेत. नांदूर नाका परिसरात रवी निमसे यांच्या भाऊबंधांच्या द्राक्ष बागा होत्या. मात्र हळूहळू त्या शेतजमिनी कोणी बिल्डरला विकतंय, तर कोणी मंगल कार्यालय लॉन्स तयार करतंय, तर कोणी हॉटेल व्यवसाय सुरु करत उत्पन्नाचा पर्यायी मार्ग शोधत आहे. त्यामुळे द्राक्ष बागांच्या खुणा दाखविणारे अँगल आणि तारा भंगाराच्या भावात विकून कर्जाचा भार हलका करण्याच्या विचारात रवी निमसे आहेत. द्राक्ष पिकांचे उत्पादन करताना शेतकऱ्यांना किती आव्हानाचा सामना करावा लागतोय. याची अनुभूती त्यांच्या शेतात आल्याशिवाय होत नाही. इतर उद्योगाप्रमाणेच अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या या द्राक्ष इंडस्ट्रीला वाचवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सरकार द्राक्ष इंडस्ट्रीसाठी काय उपाययोजना करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी उरले फक्त 3 दिवस