(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कधीकाळी पेपर टाकला, दूध विकलं, आज 400 कारचा मालक, स्वत:च्या हिमतीवर करोडपती झालेल्या 'बाबू'ची कहाणी!
भारतात श्रीमंतांच्या यादीत रोज वाढ होत आहे. सध्या अशाच एका कोट्यधीशाची चर्चा होत आहे. या कोट्याधीशाने कधीकाळी दूध विकलं होतं, केस कापण्याचे काम केले होते.
Self Made Billionaire: सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ होताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेतील प्रगतीमुळे देशात श्रीमंतांची संख्याही लक्षणीयरित्या वाढत आहे. आपल्या देशात प्रत्येक वर्षाला श्रीमंताच्या यादीत नवी नावे जोडली जात आहेत. या श्रीमंतांच्या यादीत अशी काही नावे आहेत, ज्यांचा संघर्ष थक्क करणारा आहे. याच श्रीमंतांच्या यादीत रमेश बाबू (Ramesh Babu) हे नावही असेच आहे. आजघडीला त्यांच्याकडे 400 पेक्षा अधिक कार आहेत. ते आज 1200 कोटी रुपयांचे मालक आहेत.
रमेश बाबू यांच्याकडे 400 कार
रमेश बाबू आज कोट्यधीश आहेत. घरी कोणताही वारसा नसताना त्यांनी तब्बल 1200 कोटी रुपयांची संपत्ती जमवलेली आहे. त्यांच्याकडे सध्या 400 वेगवेगळ्या कार आहेत. ते आज कार रेंटल इंडस्ट्रीचे (Car Rental Industry) बादशाह मानले जातात. त्यांच्याकडे आज दिग्गज अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि रतन टाटा (Ratan Tata) यांच्यापेक्षा अधिक कार आहेत.
पेपर वाटले, दूध विकलं, केशकर्तनालयात काम केलं
रमेश बाबू यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. ते एक सेल्फ मेड करोडपती आहेत. त्यांच्याकडे आज जगभरातील दिग्गज कार आहेत. आज त्यांना कार रेंटल इंडस्ट्रीतील सर्वांत मोठा ब्रँड म्हटले जाते. घरी गरिबी असल्यामुळे त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षापासून कामाला सुरुवात केली. त्यांनी अगोदर पेपर वाटले. नंतर दूध विकला. तसेच रस्त्याच्या बाजूला त्यांच्या वडिलांचे एक केस कापण्याचे दुकान होते. या दुकानतही त्यांनी लोकांचे केस कापण्याचे काम केले. अशा हलाखीच्या परिस्थितीत मात्र त्यांनी शिक्षण चालूच ठेवले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा केलेला आहे.
सुरुवातीला स्वत: कार चालवली
रेंटल कार उद्योगात येण्यासाठी त्यांनी अगोदर 1993 साली मारुती ओमनी ही कार खरेदी केली. त्यांनी पुढे रमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स (Ramesh Tours & Travels) नावाने आपला उद्योग चालू केला. कालांनतराने त्यांच्या या उद्योगात वाढ होत गेली. त्यांनी सुरुवातीला स्वत: कार चालवली. पुढे उद्योगाचा विस्तार झाल्यावर ड्रायव्हर्सना कामावर ठेवले. बघता बघता त्यांचा हा उद्योग चांगलाच वाढत गेला आणि बंगलुरूमधील श्रीमंतांमध्ये त्यांची गणना होऊ लागली.
आज रमेश बाबू यांच्याकडे एकूण 400 कार आहेत. त्यांनी 2004 साली श्रीमंत ग्राहकांकडे लक्ष केंद्रीत केले. त्यांनी आपल्या ताफ्यात मर्सिडीझ बेंझ ई क्लास सेडान ही पहिली लक्झरी कार आणली. त्यांची ही कल्पनादेखील यशस्वी ठरली. त्यानंतर ते या इंडस्ट्रीचे बादशाह म्हणून ओळखले जाऊ लागले. आज त्यांच्याकडे मर्सिडीझसह रोल्स रॉयस यासारख्या बड्या कार आहेत. अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते, व्यापारी गरज पडल्यास रमेश टुर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीच्या गाड्यांचा वापर करतात.
हेही वाचा :
म्युच्यूअल फंडात पैसे गुंतवताय? मगा अगोदर 'या' गोष्टी जाणून घ्या, अन्यथा आर्थिक फटका बसण्याची शक्यता