Inflation: आंघोळ करणे, कपडे धुणं आता महागणार? साबण-शॅम्पूचे दर 'या' कारणाने वाढणार
Detergent Prices: तुमचं आंघोळ करणे, कपडे धुणे महागण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी सरकारकडून कर वाढ कारणीभूत ठरू शकते.
Inflation: किरकोळ महागाई दरात काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी सामान्य लोकांना महागाईची झळ अद्यापही बसत आहे. एकीकडे जीवनावश्यक घटक असलेला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर वाढत चालले आहेत. तर, दुसरीकडे आता महागाईची झळ तुमच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठीदेखील बसणार आहे. आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी आता तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. येत्या काही दिवसात साबण, शॅम्पू आणि डिटर्जेंट पावडरचे दर वाढण्याची शक्यता आहे.
या साहित्यावरील शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव
'इकॉनॉमिक्स टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, साबण, शैम्पू आणि डिटर्जंट सारख्या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणार्या मोठ्या कच्च्या मालावर कर वाढवण्याचा सरकाचा प्रस्ताव आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी, वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या Directorate General of Trade Remedies (DGTR) इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून येणार्या सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोलवरील कर वाढवण्याची शिफारस केली आहे. या साहित्यावरील अँटी डंपिंग ड्युटीचे दर वाढवण्याबरोबरच अतिरिक्त काउंटरवेलिंग ड्युटी लावण्याचा प्रस्ताव आहे.
जर सरकारने Directorate General of Trade Remedies (DGTR) चा प्रस्ताव मान्य केला, तर येत्या काळात सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोलची आयात महाग होईल. इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोल खरेदी करण्यावर जास्त शुल्क आकारले जाईल. इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड हे सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोलचे स्रोत असणारे प्रमुख देश आहेत. दुसरीकडे, सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोल साबण, शॅम्पू आणि डिटर्जंट बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. हा कच्चा माल महाग झाल्यास वाढलेल्या किमतीचा बोजा ग्राहकांवरही कंपन्यांवर पडणे स्वाभाविक आहे.
रोजगार देणारे क्षेत्र
साबण, शॅम्पू आणि डिटर्जंट उद्योग हा 2.5 अब्ज डॉलर इतका आहे. या उद्योगात 9 हजारांहून अधिक लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. उद्योगावरील कोणताही नकारात्मक परिणाम या हजारो लोकांच्या रोजगारावरही परिणाम करू शकतो.
उद्योजकांनी व्यक्त केली चिंता
ET ने दिलेल्या वृत्तानुसार, साबण, शॅम्पू आणि डिटर्जंट उद्योजकांची संघटना असलेल्या इंडियन सर्फेक्टेंट ग्रुपने (ISG) DGTR ने केलेल्या शिफारसींवर चिंता व्यक्त केली आहे. ISGने अर्थ मंत्रालयाला पत्र लिहून सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोलवर शुल्क वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. या शिफारसी लागू न करण्याची विनंती त्यांनी केली आहे. या शिफारसी लागू केल्यास उत्पादकांना मिळणाऱ्या उत्पन्नावर याचा परिणाम होईल अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. उत्पन्नावर परिणाम झाल्यास उद्योग चालवणेदेखील कठीण होईल, असेही उद्योजकांनी म्हटले आहे.
ISG ने म्हटले की, आतापर्यंत साबण, शॅम्पू आणि डिटर्जंट तयार करणाऱ्या कंपन्या उत्पादन खर्चाचा मोठा बोझा उचलत आहेत. अशा परिस्थितीत कच्च्या मालाचे दर वाढल्यास आणखी खर्च वाढेल. त्याच्या परिणामी साबण, शॅम्पू, डिटर्जंटच्या दरात मोठी वाढ होईल.