Inox Green Energy Listing: आयनॉक्स ग्रीन कंपनी शेअर बाजारात लिस्टिंग, गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा, इतक्या दरावर झाली लिस्टिंग
Inox Green Energy Listing: पवन ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आयनॉक्स ग्रीन एनर्जी कंपनीची आज डिस्काउंट दरात लिस्टिंग झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांची घोर निराशा झाली आहे.
Inox Green Energy Listing: पवन ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आयनॉक्स ग्रीन एनर्जी कंपनी (Inox Green Energy Listing )आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. आयपीओमध्ये शेअर मिळालेल्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्यावेळी चांगला परतावा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली. आयनॉक्स ग्रीन एनर्जी आज प्रति शेअर 8 टक्क्यांच्या डिस्काउंट दरावर लिस्ट झाला.
कंपनीने आयपीओमध्ये प्रति शेअर 61 ते 65 रुपये इतका शेअर बँड निश्चित केला होता. मात्र, बाजारात सूचीबद्ध होताना निफ्टीवर 60 रुपयांवर आणि सेन्सेक्सवर 60.5 रुपयांवर लिस्ट झाला.
आयनॉक्स ग्रीन एनर्जीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून फारसा उत्साहजनक प्रतिसाद मिळाला नव्हता. आयनॉक्स ग्रीन एनर्जीचा आयपीओ 1.55 पटीने सब्सक्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेला कोटा 4.70 पटीने सब्सक्राइब झाला होता.
आयनॉक्स ग्रीन एनर्जी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 333 कोटी रुपये जमवले होते. आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेला हा निधी कंपनीवरील कर्ज फेडणे आणि नवीन कामांसाठी वापरण्यात येणार आहे.
आयनॉक्स ग्रीन ही कंपनी पवन ऊर्जा प्रकल्पांचे संचलन आणि त्यांचे देखभाल करणारी सेवा पुरवते. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कंपनी कार्यरत आहे.
आयपीओ आल्यानंतर काही ब्रोकरेज संस्था या आयनॉक्स ग्रीनच्या लिस्टिंगबाबत सकारात्मक होत्या. कंपनी हरीत ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असल्याने भविष्यात कंपनीच्या व्यवसायाला मागणी येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. कंपनीचे शेअर दीर्घकालीन मुदतीसाठी घेतल्यास फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रिलायन्स सिक्युरिटीचे एनालिस्ट अराफत सय्यद यांनी म्हटले की, मागील दोन वर्षात कंपनीला तोटा सहन करावा लागला होता. मात्र, सरकार सध्या हरीत ऊर्जेवर अधिक लक्ष देत आहे. त्यामुळे कंपनीला फायदा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कंपनीचा पोर्टफोलिओ मजबूत असल्याचेही त्यांनी म्हटले.
सलग तीन दिवस बाजारात लिस्टिंग
शेअर बाजारात सलग तीन दिवस नवीन कंपन्या लिस्ट होत आहेत. बुधवारी, Kaynes Techonology कंपनी बाजारात सूचीबद्ध झाली होती. केन्स टेक्नॉलॉजीचा शेअर प्रीमियम दराने 778 रुपयांवर लिस्ट झाला.
सोमवारी फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स (Five Star Business Finance) आणि आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज (Archean Chemical Industries) या दोन कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्या. आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजचा शेअर 10 टक्के प्रीमियम दराने लिस्ट झाला. तर, दुसरीकडे फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्सचा शेअर 5 टक्के डिस्काउंट दरावर सूचीबद्ध झाला.
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांना सल्ला घ्यावा. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे.)