'या' दमदार कंपनीची धमाकेदार कामगिरी! तीन महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; भविष्यातही देऊ शकते चांगले रिटर्न्स?
भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्या गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहेत. यामध्ये संरक्षण क्षेत्रातील एका महत्त्वाच्या कंपनीचाही समावेश आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Mumbai Lok Sabha Election 2024) पडझड झाल्यानंतर आता भारतीय शेअर बाजार (Share Market) पुन्हा एकदा सावरत आहे. भांडवली बाजारातील अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. दरम्यान, संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजिज या कंपनीनेही दमदार कामगिरी केली आहे. या कंपनीने गेल्या तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल दुप्पट रिटर्न्स दिले आहेत. सध्या या कंपनीचा शेअर 1388.70 रुपयांवर पोहोचला आहे. 12 जून 2024 रोजी हा शेअर 895.10 रुपयांवर होता.
तीन महिन्यांत तब्बल 127 टक्क्यांनी रिटर्न्स
गेल्या तीन महिन्यांपासून पारस डिफेन्स (Paras Defence) या कंपनीचा शेअर एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचला आहे. तीन महिन्यात या शेअरमध्ये 55 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 9 दिवसांत या कंपनीचा शेअर थेट 87 टक्क्यांनी वाढला आहे. तर तीन महिन्यांचा विचार करायचा झाल्यास या कंपनीने आपल्या गुतंवणूकदारांना दुप्पट रिटर्न्स दिले आहेत. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजिज या कंपनीनचा शेअर 28 मार्च 2024 रोजी 612.05 रुपयांवर होता. आता 18 जून 2024 रोजी हा शेअर 1388.70 रुपयांवर बंद झाला आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास गेल्या 3 महिन्यांत या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 127 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. या शेअरचे 52 आठवड्यांतील निचांकी मूल्य 580.05 रुपये आहे.
अवघ्या 175 रुपयांवर आला होता कंपनीचा आयपीओ
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज या कंपनीचा आयपीओ 175 रुपयांवर आला होता. या कंपनीचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी 21 सप्टेंबर 2021 रोजी खुला झाला होता. 23 सप्टेंबर 2021 रोजी हा आयपीओ बंद झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली होती. शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला तेव्हा या कंपनीचा शेअर 475 रुपये होता. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये साधारण 150 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. 17 जून 2022 रोजी या कंपनीचा शेअर 558.80 रुपयांवर होता. हाच शेअर 18 जून 2024 रोजी 1388.70 रुपयांवर पोहोचला. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज या कंपनीत संस्थापकांची हिस्सेदारी 58.94 टक्के आहे. पब्लिक शेयरहोल्डिंग 41.06 टक्के आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
पीएम शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये अद्याप आले नाही? मग तक्रार कुठे करावी? जाणून घ्या A टू Z माहिती