Share Market Opening Bell: सेन्सेक्स, निफ्टीची पुन्हा ऐतिहासिक भरारी; शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत
Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज तेजीने झाली. सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकांने पुन्हा एकदा 52 आठवड्यातील उच्चांक गाठला.
Share Market Opening Bell: शेअर बाजारातील तेजी आजही कायम असून सेन्सेक्स (Sensex), निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारले आहेत. सेन्सेक्स 123 अंकांनी वधारला असून 62820 अंकावर खुला झाला. तर, निफ्टीदेखील 18659 अंकांवर खुला झाला. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसत असून सेन्सेक्स, निफ्टीने उच्चांक गाठला.
आजही शेअर बाजारात खरेदीचे संकेत दिसून येत आहेत. मात्र, बाजारात आज अस्थिरता राहण्याची शक्यता जाणकरांनी व्यक्त केली आहे. बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर तेजीत असणाऱ्या शेअर बाजारात नफावसुली सुरू झाल्याने काही वेळाने बाजारात घसरण दिसून येऊ लागली. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 12.83 अंकांनी वधारत 62,694.67 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 14.75 अंकांच्या तेजीसह 18,632.80 अंकांवर व्यवहार करत होता.
Sensex climbs 183.9 points to 62,865.74 in early trade; Nifty advances 61.5 points to 18,679.55
— Press Trust of India (@PTI_News) November 30, 2022
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 19 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते. तर 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांमधील 32 कंपन्यांचे शेअर वधारले होते. तर, 18 कंपन्यांचे शेअर दर घसरले.
निफ्टीमध्ये हिंदाल्कोच्या शेअर दरात 2.53 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 1.21 टक्के, डॉ. रेड्डी लॅबच्या शेअर दरात 1.09 टक्के, टाटा स्टीलच्या शेअर दरात 1.04 टक्क्यांची तेजी दिसून आली. बीपीसीएलच्या शेअर दरात 0.91 टक्क्यांची घसरण दिसून आली. एचसीएल टेकच्या शेअर दरात 0.89 टक्के, महिंद्रा टेकच्या शेअर दरात 0.87 टक्के, अपोलो हॉस्पिटलच्या शेअर दरात 0.86 टक्के, इन्फोसिसच्या शेअर दरात 0.72 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
बँक निफ्टीतही आज तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टी निर्देशांक आज 43,122.75 अंकांवर खुला झाला. बँक निफ्टीने आज 43,252.35 अंकांपर्यंतची पातळी गाठली होती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बँक निफ्टी 43,145.20 अंकांवर व्यवहार करत होता.
मंगळवारी बाजारात तेजी
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 383 अंकांनी वधारत 62,887 अंकांची उच्चांकी पातळी गाठली. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 18678 अंकांची पातळी गाठत ऐतिहासिक पातळी गाठली. शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 177 अंकांच्या तेजीसह 62,681 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांक 55.30 अंकांच्या तेजीसह 18618 अंकांवर स्थिरावला. निफ्टीत आज बाजारात व्यवहार झालेल्या 1653 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1717 कंपन्यांचे शेअर दर घसरले होते.