Subrata Roy Dies : उद्योगपती सुब्रत रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन; मुंबईत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
Sahara Group founder Subrata Roy Dies : सहारा समुहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे मुंबईत दीर्घ आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले.
Subrata Roy Dies : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय (Subrata Roy) यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. 'सहारा' प्रमुख सुब्रत रॉय (Subrata Roy ) दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांचे पार्थिव लखनौमधील सहारा शहरात आणले जाईल, जिथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. सुब्रत रॉय यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. भारतीय कॉर्पोरेट जगतात त्यांनी आपली वेगळी छाप सोडली होती.
सुब्रत रॉय यांचा जन्म बिहारमधील अररिया येथे एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणी ते नेहमीच हुशार विद्यार्थी म्हणून गणले जात होते. त्यांनी गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला. सहारा समूहाची स्थापना करण्यापूर्वी, त्यांना रिअल इस्टेट व्यवसायात 18 वर्षे काम केले. त्याशिवाय, बिझनेस डेव्हलपमेंटचा 32 वर्षांचा अनुभव होता. त्यांनी स्वप्ना रॉयशी लग्न केले आहे. त्यांना 2 मुले आहेत, सुशांतो रॉय जे कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सीमंतो रॉय हे कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत.
सुब्रत रॉय सहारा यांचा जन्म 10 जून 1948 रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात 'सहरश्री' म्हणूनही ओळखले जात होते.
सहाराश्री सुब्रत रॉय जी का निधन, अत्यंत दुःखद।
— Samajwadi Party (@samajwadiparty) November 14, 2023
ईश्वर उनकी आत्मा को शांति दें।
शोकाकुल परिजनों को ये असीम दुःख सहने का संबल प्राप्त हो।
भावभीनी श्रद्धांजलि ! pic.twitter.com/QO6vAjriAv
समाजवादी पक्षाने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून श्री सुब्रत रॉय यांच्या निधनाने दु:ख झाल्याचे म्हटले आहे. अतिशय दु: खी. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली.
अनेक व्यवसायात आघाडीचा ब्रॅण्ड, 11 लाख लोकांना रोजगार
सुब्रत रॉय यांच्या नेतृत्वातील सहारा समुहाने विविध उद्योग-व्यवसायात हात आजमावला. सहारा समुहाकडे आयपीएलची पुणे फ्रँचायझी होती आणि फॉर्म्युला वन रेसिंग टीम फोर्स इंडियामध्ये त्यांचा महत्त्वाचा हिस्सा होता. 90,000 कोटी रुपयांच्या नियोजित गुंतवणुकीसह देशभरात 60 हून अधिक आलिशान टाउनशिप विकसित करण्याची समूहाची योजना होती. अनेक टाउनशिपसाठी भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास संपली होती. या समूहाने सुमारे 11 लाख लोकांना रोजगार दिला आणि रिअल इस्टेट, वित्तीय सेवा, विमा, मीडिया आणि मनोरंजन, क्रीडा आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांची उपस्थिती होती. बॉलीवूड तारे आणि प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्व सहाराच्या बहुतेक कार्यक्रमांना नियमित उपस्थित होते.
राजकीय संबंधांची चर्चा
सुब्रत रॉय यांचे समाजवादी पक्षाचे अमर सिंह आणि मुलायमसिंह यादव यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्यांच्याशी असलेल्या संबंधाने सुब्रत रॉय यांना फायदा होत असल्याच्या चर्चा होत असे. मात्र, रॉय यांचे जवळपास सर्वच राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध होते. भारतीय कॉर्पोरेट जगतात त्यांनी आपली वेगळी छाप सोडली होती.
सेबीची कारवाई आणि सहाराला ग्रहण
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सोबत दीर्घ कायदेशीर लढाईनंतर गुंतवणूकदारांविरुद्ध कथित फसवणूक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहारा प्रमुखांना त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांसह तुरुंगात टाकण्यात आले. 4 मार्च 2014 रोजी त्याची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. रॉय हे पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आले होते. सुब्रत रॉय यांना व्याजासह गुंतवणूकदारांना 20,000 कोटी रुपये परत करण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडे भारतात आणि परदेशात अनेक स्थावर मालमत्ता आहेत.
सुब्रत रॉय यांच्यावर त्यांच्या गुंतवणूकदारांनी दिलेले पैसे परत न केल्याचा आरोप होता. यामुळे SEBI ने त्याच्यावर कारवाई केली आणि 20 दशलक्ष डॉलर्सचा परतावा हा त्यांच्यासमोर अडचणीचा ठरला. यानंतर रॉय कुटुंबासाठी अनेक संकटांची मालिका सुरू झाली. रॉय यांना तुरुंगात जावे लागले आणि त्यांच्या व्यवसायालाही फटका बसला.