PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये विनाअडथळा मिळवण्यासाठी 'या' तीन गोष्टींची खात्री अन् पूर्तता करा, 31 मे पर्यंत विशेष मोहीम
PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये तीन समान हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपये दिले जातात.

PM Kisan Samman Nidhi नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांप्रमाणं 6000 रुपये केंद्र सरकारच्या केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून दिले जातात. केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना 19 हप्त्यांची रक्कम दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व हप्त्यांची रक्कम मिळाली असेल ती एकूण 38000 रुपये इतकी होते. पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी देण्यात आली होती. आता शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पीएम किसानच्या दोन हप्त्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचा कालावधी असतो. मात्र, पीएम किसानच्या शेतकऱ्यांना तीन गोष्टी अपूर्ण असल्यास पूर्तता करण्यास 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ई-केवायसी, बँक खातं आधार लिंक आणि जमीन पडताळणी आवश्यक
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना 20 वा हप्ता जून महिन्यात मिळेल, अशी शक्यता आहे. आता पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी विनाअडथळा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांचं बँक खातं आणि आधार क्रमांक लिंक असणं आवश्यक आहे. लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वत: ची जमीन असणं आवश्यक आहे. याशिवाय त्या शेतकऱ्यानं त्याची पडताळणी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. याबाबींची पूर्तता करण्यास पीएम किसान सन्मान निधीतर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे. 1 मे ते 31 मे दरम्यान या बाबी अपूर्ण असतील तर त्या पूर्ण केल्या पाहिजेत. पीएम किसान सन्मान निधी योजना निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सॅच्युरेशन ड्राईव्ह सुरु करण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी या गोष्टींची पूर्तता केल्यास शेतकऱ्यांना पीएम किसानची रक्कम मिळण्यात अडचणी येणार नाहीत.
पीएम किसान सैचुरेशन ड्राइव: 1 मई से 31 मई 2025 तक सुनिश्चित करें कि कोई भी पात्र किसान लाभ से वंचित न रहे।
— PM Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) May 20, 2025
आज ही eKYC कराएं, आधार से बैंक खाता लिंक करें और भूमि रिकॉर्ड सत्यापित करवाएं।
निकटतम जन सेवा केंद्र जाएं और योजना का लाभ पाएं। #Agriculture #PMKisan #20thinstalment pic.twitter.com/zkQR9eV4We
शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा
पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्यावतीनं डिसेंबर 2018 मध्ये जाहीर करण्यात आली होती. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पहिला हप्ता फेब्रुवारी 2019 पासून देण्यास सुरुवात झाली. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे. पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची रक्कम बिहारमधील एका कार्यक्रमातून वर्ग करत देण्यात आली होती. त्यापूर्वी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका कार्यक्रमात पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्याची रक्कम दिली गेली होती. आता शेतकरी खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहत आहेत.



















