PF खातेधारकांना मंजूर झालेलं 8.25 टक्के व्याज कधी जमा होणार? करोडो खातेधारकांना होणार फायदा
PF Interest Credit: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफवरील व्याज वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या वाढीव व्याजदराचा 7 कोटींहून अधिक लोकांना लाभ मिळणार आहे.
PF Interest Credit: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफवरील व्याज वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या वाढीव व्याजदराचा 7 कोटींहून अधिक लोकांना लाभ मिळणार आहे. EPFO ने PF खातेधारकांसाठी 8.25 टक्के व्याज मंजूर केले आहे. आता करोडो पीएफ खातेधारक त्यांच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे जमा होण्याची वाट पाहत आहेत. पीएफ खात्यात व्याजाचे पैसे नेमके कधी होणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आर्थिक वर्ष 2023-24 साठी PF वर 8.25 टक्के व्याजदर
काल (शनिवार 10 फेब्रुवारी) EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर, अधिकृत निवेदनात म्हटले आहे की CBT ने आर्थिक वर्ष 2023-24 साठी PF वर 8.25 टक्के दराने व्याजदर मंजूर केला आहे. यापूर्वी, पीएफ खातेधारकांना आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 8.15 टक्के आणि 2021-22 मध्ये 8.10 टक्के दराने व्याज मिळत होते. त्यामुळं, आता पीएफवरील व्याज 3 वर्षातील सर्वाधिक वाढले आहे.
EPFO ग्राहकांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करणार
यावेळी ईपीएफओने अधिक कमाई केली आहे. त्यामुळं पीएफ खातेधारकांना जास्त व्याजाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी EPFO एकूण 1.07 लाख कोटी रुपये व्याज म्हणून वितरित करणार आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा EPFO ग्राहकांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करणार आहे.
EPFO ला कसे मिळतात पैसे?
EPFO सामाजिक सुरक्षा निधी PF चे व्यवस्थापन करते. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी पीएफ ही सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा आहे. सध्या देशभरात त्याचे 7 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. ईपीएफओकडे सध्या सुमारे 13 लाख कोटी रुपये जमा आहेत. हा निधी शेअर बाजारासह विविध ठिकाणी गुंतवून EPFO पैसे कमावते आणि कमावलेले पैसे ग्राहकांना व्याजाच्या स्वरूपात परत केले जातात. EPFO द्वारे व्याजाचे पैसे ग्राहकांच्या खात्यात वर्षातून दोनदा जमा केले जातात.
अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा, व्याजाच्या पैशासाठी थोडी वाट पाहावी लागणार
ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता पीएफ खातेधारक व्याजाचे पैसे जमा होण्याची वाट पाहत आहेत. CBT च्या मंजुरीनंतर व्याजदरावर घेतलेल्या निर्णयाला अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. वित्त मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, व्याजदर गॅझेटमध्ये सूचित केले जातात, त्यानंतर व्याजाचे पैसे खात्यात पाठवले जातात. म्हणजे व्याजाच्या पैशासाठी लोकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
पीएफ खातेधारक कशी तपासू शकतील रक्कम?
मेसेज अलर्टद्वारे सदस्यांना याची माहिती दिली जाते. पीएफ खातेधारक त्यांची शिल्लक देखील तपासू शकतात. पीएफ व्याजाच्या रकमेबद्दल माहिती मिळवू शकतात. यासाठी पीएफ खातेधारकांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. EPFO वेबसाइटवर थेट लॉग इन करुन खात्याचे तपशील तपासले जाऊ शकतात. उमंग ॲपद्वारे शिल्लक तपासण्याची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय मिस्ड कॉल आणि मेसेजद्वारेही शिल्लक तपासता येते.
महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! PF ठेवींवरील व्याजदरात मोठी वाढ, कोट्यावधी कर्मचाऱ्यांना दिलासा; नेमकी किती केली वाढ?