Pension : फक्त एकदाच प्रीमियम भरा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन; जाणूम घ्या भन्नाट स्कीम
Investment Plan : एलआयसीच्या सरल पेन्शन स्कीममध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते. गुंतवणुकदार स्वत: पुरतं अथवा जोडीदाराच्या नावाने सरल पेन्शनमध्ये गुंतवणूक करू शकतात.
मुंबई : पगारदार कर्मचारी अनेकदा सेवानिवृत्तीच्या नियोजनाची चिंता करतात. तुम्ही फक्त एका वयापर्यंत काम करू शकता. यानंतर निवृत्ती घ्यावी लागते. निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी पैशांची कमतरता भासू नये यासाठी नियमित पेन्शन (Pension) आवश्यक आहे. यासाठी एलआयसीची पेन्शन (LIC Pension) योजना हा एक चांगला पर्याय असू शकतो. LIC आपल्या ग्राहकांना अनेक पेन्शन योजना ऑफर करते. यापैकी एक LIC सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Plan) आहे. ही एक नॉन-लिंक केलेली, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक तत्काळ वार्षिकी योजना आहे. येथे गुंतवणूक करून तुम्हाला चांगली पेन्शन मिळू शकते.
फक्त एकदाच भरा प्रीमियम
एलआयसीच्या सरल पेन्शन स्कीममध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते. गुंतवणुकदार स्वत: पुरतं अथवा जोडीदाराच्या नावाने सरल पेन्शनमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 40 वर्षे आणि कमाल वय 80 वर्षे आहे. एकरकमी गुंतवणुकीनंतर तुम्हाला पेन्शन मिळत राहते. योजना घेताना गुंतवणूकदाराला एकरकमी प्रीमियम भरावा लागतो. या योजनेची खास गोष्ट अशी आहे की, ज्या रकमेपासून पेन्शन सुरू होते, तेवढीच रक्कम आयुष्यभर मिळते. ही पॉलिसी सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते.
हे पर्याय योजनेत आहेत
या योजनेत तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. मासिक पेन्शन किमान 1,000 रुपये, त्रैमासिक पेन्शन किमान 3,000 रुपये, सहामाही पेन्शन किमान 6,000 रुपये आणि वार्षिक पेन्शन किमान 12,000 रुपये आहे. या योजनेत जास्तीत जास्त पेन्शन रकमेवर मर्यादा नाही. तुम्ही 42 वर्षांचे असाल आणि तुम्ही 30 लाख रुपयांची वार्षिकी खरेदी करत असाल तर तुम्हाला 12,388 रुपये मासिक पेन्शन मिळेल. आता तुम्हाला पेन्शनमध्ये जास्त रक्कम मिळवायची असेल, तर त्यानुसार तुम्ही एकरकमी प्रीमियममध्ये जास्त रक्कम जमा करू शकता.
तुम्हाला कर्जही मिळेल
तुम्ही एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेअंतर्गतही कर्ज घेऊ शकता. योजना सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर गुंतवणूकदार कर्जासाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्यास, तुम्ही पॉलिसीमध्ये जमा केलेले पैसेही काढू शकता. पॉलिसी सरेंडर केल्यावर, ग्राहकाला मूळ किमतीच्या 95 टक्के परत मिळतात.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा, योजनेशी संबंधित ,सर्व माहिती, दस्ताऐवज वाचावेत.)