(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Post Office scheme: पोस्टाच्या 'या' योजनेत मिळतो गुंतवलेल्या पैशांवर 7.4 टक्क्यांचा परतावा! सलग 5 वर्षे मिळणार लाभ, जाणून घ्या A टू Z माहिती
Finanace: बँकेच्या व्याजदरापेक्षा अधिक व्याजदरामुळे ही योजना ठरू शकते फायद्याची, पात्रता, कालावधी, निकष, कागदपत्रे आणि परतावा अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या एकाच क्लिकवर
Post Office Scheme: कोणत्याही बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटला 2.75% ते 3.50% व्याजदर असताना पोस्टाच्या या योजनेत तब्बल 7.4 टक्क्यांच्या व्याजानं परतावा मिळतो. सलग पाच वर्षे यात पैसे गुंतवले तर सामान्य परताव्याच्या कितीतरी अधिक रिटर्न मिळू शकतात. पोस्ट ऑफीस मंथली इनकम योजनेत निश्चित उत्पन्नाच्या हमीसह व्याजदरही अधिक असल्यानं ही योजना लाभदायक ठरू शकते.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम (POMIS)योजना ही कोणत्याही बचत खातं टाईम डिपॉझिट व पोस्ट ऑफिसच्या इतर योजनांच्या तुलनेत सर्वाधिक कमाई करून देणारे योजनांपैकी एक आहे. या योजनेच्या नावाप्रमाणेच पाच वर्षांसाठी गुंतवलेल्या रकमेचा परतावा दर महावितरित केला जातो. पोस्टाच्या इतर योजनांप्रमाणेच वित्त मंत्रालयाची मान्यता प्राप्त ही योजना आहे.
गुंतवणूकदाराला दर महिन्याला वितरित होते व्याज
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही सर्वाधिक कमाई देणारी कमी जोखीम असणारी आणि स्थिर उत्पन्न योजनांपैकी एक आहे. जी वार्षिक 7.4 टक्क्यांचा व्याजदर देते. या योजनेत गुंतवणूकदार दर महिन्याला रक्कम जमा करू शकतो आणि गुंतवलेल्या रकमेचे व्याज दर महिन्याला वितरित केले जाते. विशेष म्हणजे या व्याजातून कोणताही टीडीएस (TDS) कापला जात नाही.
परवडणारी रक्कम गुंतवता येते
या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला परवडणारी ठेव रक्कम गुंतवता येते. तुम्ही हजार रुपयाचा नाममात्र गुंतवणुकीवरही या योजनेत खाते उघडू शकता. एका खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा ही 9 लाखांची आहे. जर जॉईंट अकाउंट असेल तर गुंतवणुकीची कमाल मर्यादा पंधरा लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मॅच्युरिटी चा कालावधी किती?
पोस्ट ऑफिस MIS खात्यासाठी कमाल रक्कम ठेवण्याचा कालावधी हा 5 वर्ष आहे. पाच वर्षानंतर गुंतवणूकदाराला त्याची रक्कम काढता येऊ शकते किंवा हीच रक्कम तो पुन्हा गुंतवूही शकतो. या योजनांच्या नियमानुसार गुंतवणूकदाराला ठेवीच्या तारखेपासून एक वर्षाची मुदत संपण्यापूर्वी ठेव काढता येणार नाही. जर एका वर्षाच्या आत गुंतवलेली रक्कम काढली तर गुंतवणूकदाराला दंड आकारला जातो. या योजनेचे खाते उघडण्याचा तारखेपासून तीन वर्षांपूर्वी खाते बंद केले असल्यास दोन टक्के रक्कम मुद्दलातून वजा केली जाते.
या योजनेसाठी पात्रता काय?
- पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडण्यासाठी गुंतवणूकदार भारतीय निवासी असणे आवश्यक आहे.
- निवासी भारतीय 10 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या अल्पवयीन मुलाच्या वतीने देखील हे खाते उघडू शकतो. पण मुलाला 18 वर्षाच्या झाल्यानंतरच या रकमेचा लाभ घेता येतो.
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड यापैकी कोणताही सरकारने जारी केलेल्या ओळखपत्राची प्रत
- गुंतवणूकदाराचा निवासी पत्ता किंवा अलीकडे युटीलिटी बिल असलेला सरकारने जारी केलेला आयडी
- पासपोर्ट साईज फोटो