(Source: ECI/ABP News/ABP Majha)
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
या बाईकच्या लाँचिंगप्रसंगी बोलताना राजीव बजाज म्हणाले की, सीएनजी बाईक ही "बजाजची गॅरंटी" आहे, असं आम्ही म्हणू शकतो.
पुणे : पेट्रोल दरवाढीला पर्याय म्हणून सीएनजी (CNG) वाहनांची सध्या बाजारात मागणी वाढली आहे. दुसरीकडे इलेक्ट्रीक बाईकलाही ग्राहकांची पसंती मिळत असून ईव्ही चारचाकी वाहनांनंतर आता ईव्ही बाईकही बाजारात विविध मॉडेल्स आणि कंपनीच्या माध्यमातून रस्त्यावर अवतरल्या आहेत. त्यातच, आता वाहनधारकांसाठी सर्वात मोठी गुडन्यूज बजाज (Bajaj) कंपनीने आणली आहे. मायलेजच्या बाबतीत नेहमीच ग्राहकांची पसंत ठरलेल्या बजाज कंपनीच्या दुचाकीने आता नवा टप्पा गाठला आहे. कारण, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याहस्ते जगातील पहिली सीएनजी बाईक आज लाँच करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये हा लाँचिंग सोहळा संपन्न झाला असून यावेळी, राजीव बजाज यांनी नितीन गडकरींकडून अपेक्षाही व्यक्त केली आहे. दरम्यान, बजाज सीएनजी बाईक ही पेट्रोल आणि सीएनजी अशी हायब्रीड बाईक असून 2 किलो सीएनजीमध्ये तुम्ही 230 किमी प्रवास करू शकता. तर, 2 लीटर पेट्रोल आणि 2 किलो सीएनजीमध्ये तुम्हाला 330 किमीचा टप्पा गाठता येईल.
या बाईकच्या लाँचिंगप्रसंगी बोलताना राजीव बजाज म्हणाले की, सीएनजी बाईक ही "बजाजची गॅरंटी" आहे, असं आम्ही म्हणू शकतो. आता तुम्हीही तुमच्या भाषणात 'नितीन गडकरींची गॅरंटी' असा उल्लेख कराल, अशी अपेक्षा आहे, असे म्हणत राजीव बजाज यांनी केंद्रीयमंत्री महोदयांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. सीएनजी पंपांची देशभरात कमतरता आहे, या सीएनजी पपांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी. या अनुषंगाने राजीव बजाज यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे, बजाजकडून सीएनजी बाईकची गॅरंटी देण्यात आली असली तरी, सीएनजी पंपांची संख्या लक्षात घेता, वाहनधारकांना जास्तीत-जास्त सीएनजी पेट्रोल पंपांची गरज भासणार आहे.
सध्या देशात सीएनजी पंपांची संख्या कमी असल्याने वाहनांच्या रांगाच रांगा सीएनजी पंपावर लागलेल्या पाहायला मिळतात. सीएनजी पंपांवर केवळ चारचाकी गाड्या दिसून येतात. पण, यापुढे सीएनजी पंपांवर बजाजच्या दुचाकी गाड्याही दिसून येतील. या दुचाकीमध्ये एका वेळेस केवळ 2 किलो सीएनजी भरला जाऊ शकतो. त्यामुळे, सीएनजी पंपांची देशातील संख्या वाढवण्याची गरज आहे.बजाज कंपनीने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाईकची निर्मिती केली. जगातील ही पहिली सीएनजी बाईक असल्याचा दावा बजाज कंपनीने केला आहे. या बाईकमुळं दुचाकीस्वारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
किंमत 1 लाखापेक्षा कमी असावी
याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, या सीएनजी बाईकची किंमत 1 लाखांपेक्षा कमी असावी. प्रदूषणमुक्त भारत करण्याचं माझं सर्वात मोठं ध्येय आहे. त्याअनुषंगाने सीएनजी बाईक या ध्येयाला मोठा हातभार लावेल यात शंका नाही. वाहन उद्योग क्षेत्रात भारताचा आधी जगात सातवा नंबर होता. आता, अलीकडच्या तीन महिन्यांपूर्वीच आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचलो आहोत. पहिलं यूएसए, दुसरं चायना आणि मग भारताचा नंबर लागतो. आपण वाहन उद्योग क्षेत्रात भरारी घेतोय, असे गडकरी यांनी या बाईक लाँचिंग सोहळ्याप्रकरणी बोलताना म्हटले.
हेही वाचा
अफलातून... 230 किमी एव्हरेज, परवडणारी किंमत, 2 किलोची टाकी; अशी आहे जगातील पहिली CNG दुचाकी
जगातील पहिली CNG बाईक पुण्यात, नितीन गडकरींच्याहस्ते लाँचिंग; किंमतीबाबत काय म्हणाले केंद्रीयमंत्री