(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा? नमो किसान योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण, किती शेतकऱ्यांना फायदा?
शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे. नमो किसान योजनेच्या (Namo Shetkari Yojana) चौथ्या हप्त्याचं ऑनलाईन वितरण आज करण्यात आलं.
Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या (Namo Shetkari Yojana) चौथ्या हप्त्याचं ऑनलाईन वितरण आज करण्यात आलं. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे , आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या हप्त्याचं वितरण करण्यात आलं.
25 ऑगस्टपर्यंत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन
परळी वैद्यनाथ इथं आजपासून 25 ऑगस्टपर्यंत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांना नमो किसान योजनेच्या चौथ्या हप्त्याचं ऑनलाईन वितरण करण्यात आलं आहे. परळी व बीड जिल्ह्याच्या इतिहासात राज्यस्तरीय कृषी महोत्सव पहिल्यांदाच होतो आहे. या महोत्सवाचे दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं.
प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये
केंद्र सरकार देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. अशाच प्रकारची योजना महाराष्ट्र सरकारनं देखील सुरु केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारनं सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार केंद्र सरकारच्या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर घालत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळणार आहेत.
91 लाख शेतकऱ्यांना फायदा
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हफ्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. या योजनेतून राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून तब्बल 1888 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. दरम्यान याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण देखील करण्यात आले. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. या योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी शेतकऱ्याला 6000 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मागील वर्षी तीन तर यंदा चौथा हप्ता देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या: