Pandharpur News: पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
Pandharpur News: तालुका पोलिसांनी ही दारू अवैध असल्याचे सांगत गुन्हा दाखल केलेला असताना उत्पादन शुल्क विभागाने ही दारू अधिकृत असल्याची भूमिका घेतल्याने आता यात दारू साठ्याबाबत दोन विभाग आमने सामने आले आहेत.
पंढरपूर: नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र मोठा उत्साह, जल्लोष दिसून येत आहे. अशातच मोठे गैरप्रकार देखील समोर येत आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवरती आल्याचं दिसून येत आहे. नवीन वर्षापूर्वी पंढरपूर तालुका पोलिसांनी रांजणी येथे 23 डिसेंबर रोजी टाकलेल्या धाडीत तब्बल 96 बॉक्समधील 3 लाख 27 हजार रुपयांची दारू पकडली होती. मात्र, या कारवाईनंतर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने आल्याचं चित्र दिसून येत आहे. तालुका पोलिसांनी ही दारू अवैध असल्याचे सांगत गुन्हा दाखल केलेला असताना उत्पादन शुल्क विभागाने ही दारू अधिकृत असल्याची भूमिका घेतल्याने आता यात दारू साठ्याबाबत दोन विभाग आमने सामने आले आहेत.
पंढरपूर तालुका पोलिसांना सापडलेला दारूसाठा हा मंगळवेढा तालुक्यातील दुकानदाराचा इमर्जन्सी उतरवलेला स्टॉक होता, त्यामुळे तो माल संबंधितांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत द्यावा लागेल, असा दावा उत्पादन शुल्क विभागाने केलेला आहे. यावरून पोलिसांनी केली कारवाई अनधिकृत की सापडलेली दारू अनधिकृत असा सवाल उपस्थित होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
23 डिसेंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत प्रदीप अवताडे याच्या घरात, जिन्याखाली 96 बॉक्समध्ये 3 लाख 27 हजार रुपयांची देशी दारू सापडली होती. ते दारूचे बॉक्स पोलिसांनी जप्त करून पोलीस ठाण्यात आणले. तसेच आरोपी प्रदीप अवताडे याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
दरम्यान, या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधून अधिक चौकशी केली असता, पोलिसांनी जप्त केलेला दारूचा साठा अनधिकृत नाही. तर, तो पूर्णपणे अधिकृत आहे. बठाण (ता. मंगळवेढा) येथील परवानाधारक दारू विक्रेत्याचा तो साठा असून आवताडे याच्या घरी इमर्जन्सीमुळे तो ठेवला होता. अशी विरोधाभासी भूमिका घेतल्याने पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग आमने-सामने आले आहे.