SIP: म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करताना 'या' गोष्टींची दक्षता घेणं आवश्यक, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP : भारतातील नोकरी करणारा वर्ग म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करत असतो. एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीवर साधारणपणे 12 ते 15 टक्के परतावा मिळतो.

SIP Investment Tips मुंबई : गुंतवणुकीचे एफडी, सोन्यातील गुंतवणूक यासह अनेक पारंपरिक प्रकार आहेत. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. त्यामध्ये फार जोखीम नसते. भारतात गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. देशातील नोकरी करणारा वर्ग मोठ्या संख्येनं एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो. एसआयपीद्वारे साधारणपणे 12 टक्के ते 15 टक्के सीएजीआरनं परतावा मिळणं अपेक्षित असतं. मात्र, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजाराची कामगिरी आणि जोखीमयुक्त अशते. बाजारात तेजी किंवा मंदी असेल तर त्याचा परिणाम गुंतवणुकीवर होतो. त्यामुळं एसआयपीद्वारे गुंतवणूक करताना गुंतवणूकदारानं सतर्कता बाळगली पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं पैशांची गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर जितका नफा अपेक्षित आहे तितका मिळत नाही. त्यामुळं नुकसान होण्याची शक्यता असते.
SIP Investment : एसआयपीद्वारे गुंतवणुकीची योग्य पद्धत
नोकरीला सुरुवात केल्यानंतर जितक्या लवकर शक्य होईलं तितक्या लवकर एसआयपी सुरु करावी. सातत्यानं गुंतवणूक केल्यास आणि योग्य कालावधी आणि कॅटेगरी निवडल्यास फायदा होऊ शकतो. जे लोक कमी वय असताना गुंतवणूक सुरु करतात त्यांना भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते.
नोकरी करणाऱ्या लोकांनी त्यांचा पगार जमा होण्याच्या तारखेचा विचार करुन एसआयपीची तारीख निवडावी. यामुळं नियमित गुंतवणूक होत राहते. यामुळं तुमचा खर्च मर्यादित होत जातो.
एसआय़पीमध्ये नियमितपणे आणि दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास एक मोठी रक्कम तयार होईल आणि चांगला परतावा मिळेल.
नोकरदारांना लोकांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणं आणि टारगेटनुसार एसआयपीची रक्कम ठरवावी.
जर तुम्हाला अधिक सुरक्षित असलेल्या फंडमध्ये गुंतवणूक करायची असले तर लार्ज कॅप फंडचा पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरेल.
दैनंदिन, मासिक आणि साप्ताहिक एसआयपीमध्ये सारखाच परतावा मिळतो. त्यामुळं नियमितपणे आणि क्षमतेप्रमाणं गुंतवणूक करावी.
भारतीय गुंतवणूकदारांनी बाजार सावरला
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे भारतीय बाजारातून काढून घेतले असले तरी भारतीय गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक दरमहा केल्यानं बाजार सावरला आहे. यावरुन एसआयपीवरील गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























