Mutual Fund: म्युच्यूअल फंडमधील गुंतवणूक 75 टक्क्यांनी घटली, नव्या SIP खात्यांची नोंदणी देखील घसरली, गुंतवणूकदारांनी रणनीती बदलली
Mutual Fund SIP Investment: नोव्हेंबर महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून म्युच्यूअल फंडमध्ये 25320 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.
Mutual Fund Inflows मुंबई: भारतीय शेअर बाजारात नोव्हेंबरमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. तेजी आणि घसरणीचं सत्र देखील पाहायला मिळालं. याचा परिणाम म्युच्यूअल फंडमधील गुंतवणुकीवर परिणाम झाल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. नोव्हेंबर महिन्यात म्यु्च्यूअल फंडमधील इनफ्लो 75 टक्क्यांनी घटल्याचं समोर आलं आहे.म्युच्यूअल फंडच्या सर्व योजनांमध्ये नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबर 2024 मध्ये 2.39 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली. इक्विटी म्युच्यूअल फंडमध्ये 14 टक्के घसरण झाली आहे. इक्विटी म्युच्यूअल फंडमध्ये नोव्हेंबरमध्ये 35943 कोटी रुपयांची गुंतवणूक आली तर ऑक्टोबर 2024 मध्ये 41886 रुपयांची गुंतवणूक आली होती.
नोव्हेंबरमध्ये एसआयपीमध्ये ना तेजी ना घसरण
एम्फी (Association of Mutual Funds of India) च्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2024 मध्ये एसआयपीद्वारे येणाऱ्या गुंतवणुकीत वाढ झाली नाही किंवा घट झाली नाही. नोव्हेंबरमध्ये एसआयपीतून म्युच्यूअल फंडमध्ये 25,320 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली तर ऑक्टोबरमध्ये एसआयपी गुंतवणुकीची रक्कम 25353 कोटी रुपये होती. नोव्हेंबरमध्ये 49.46 लाख नव्या एसआयपीची नोंदणी झाली तर ऑक्टोबरमध्ये ही संख्या 63.70 लाख होती. एसआयपीच्या खात्यांची संख्या 10.23 कोटींवर आहे. ऑक्टोबरमध्ये ती संख्या 10.12 कोटींवर होती.
एसआयपीच्या माध्यमातून 25 हजार कोटींची दरमहा गुंतवणूक
एम्फीचे सीईओ वेंकट चलासानी यांनी आकडेवारीबाबत बोलताना म्हटलं की एसआयपीच्या माध्यमातून दरमहा 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे. छोट्या कालावधीत चढ उतार असली तरी गुंतवणूकदारांची दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठीचं व्हिजन आणि आर्थिक ध्येय पाहायला मिळतं. म्युच्यूअल फंड इंडस्ट्रीतील दीर्घकालीन गुंतवणूकीबाबतचा गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो.
बाजारातील तेजी घसरण पाहता गुंतवणूकदार सतर्क
मोतीलाल ओसवाल असेट मॅनेजमेंट कंपनीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर ऑफ चीफ बिझनेस ऑफिसर अखिल चतुर्वेदी यांनी एम्फीच्या आकडेवारीवर भाष्य केलं आहे. नोव्हेंबर महिन्यात स्थूल अर्थशास्त्रीय कारणं, राजकीय घटना आणि अमेरिकेन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा परिणाम यामुळं शेअर बाजारात तेजी अन् घसरण पाहायला मिळाली. यामुळं गुंतवणूकदारांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्याऐवजी वाट पाहण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं. नोव्हेंबरमध्ये लमसम गुंतवणूक देखील घली आहे. एसआयपीमध्ये देखील फारशी तेजी पाहायला मिळाली नाही.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)