(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Digital Gold : सोन्यामध्ये गुंतवणूक करताय? त्याआधी डिजिटल सोन्यातील गुंतवणुकीचे पर्याय आणि फायदे जाणून घ्या
Digital Gold : भारतीयांना सोन्याचं आकर्षण फार असतं. सोन्यामधील गुंतवणूक कशी फायद्याची आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. आपण समजून घेऊया की सोन्याचे डिजिटल पर्याय कोणते आहेत आणि ते कसे फायद्याचे आहेत.
Investment in Digital Gold : भारतीयांना सोन्याचं (Gold) आकर्षण फार असतं. त्यामुळेच लग्नसोहळ्यात सोन्याच्या दागिन्यांना विशेष महत्त्वं असतं. पूर्वीच्या काळात पैशांची गुंतवणूक (Investment) करण्याचं ते एक मुख्य साधन होतं. आज इतर पर्याय उपलब्ध असूनही अनेक जण गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याला पहिली पसंती देतात. खरंतर इतर गुंतवणुकीतून सोन्यापेक्षा अधित परतावा मिळवून देखील सामान्यांच्या आयुष्यातील सोन्याचं स्थान हे ध्रुवताऱ्यासारखं अढळ आहे.
दरम्यान सोन्यामधील गुंतवणूक कशी फायद्याची आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. आज आपण समजून घेऊया की सोन्याचे डिजिटल (Digital Gold) पर्याय कोणते आहेत आणि ते कसे फायद्याचे आहेत. याबाबत विघ्नहर्ता गोल्ड लिमिटेडचे संचालक महेंद्र लुनिया यांनी सखोल माहिती दिली.
महेंद्र लुनिया सांगतात की, "संगणकाचे युग चालू झाल्यापासून जवळपास सर्वच बाबी डिजिटल स्वरुपात होत आहेत. जसे की, पूर्वी शेअर्स कागदी स्वरुपामध्ये होते ते आता डिमॅट स्वरुपामध्ये झालेले आपण पाहतो. त्याचा फायदा असा झाला की पूर्वी कुठलाही सौदा पूर्ण होण्यासाठी अनेक महिने लागायचे पण आता मात्र केवळ दोन दिवसात व्यवहार पूर्ण होतात. अजून याला सरकारी मान्यता नाही म्हणून, नाहीतर हे सर्व व्यवहार तात्काळ पूर्ण होऊ शकतात. याचे कारण, शेअर्स आता डिजिटल झाले आहेत."
ते पुढे म्हणतात, "काही वर्षांपूर्वी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नोटांचे किंवा पैशांचं डिजिटलायझेशन झालेले आपण पाहिले आहे आणि कोरोनाच्या परिस्थितीमुळे ते सर्वमान्य झालेले आहे. आज आपण फार कमी पैसा खिशामध्ये बाळगत आहोत. अगदी पार्किंगला द्यावे लागणारे पाच रुपये सुद्धा आपण डिजिटली देतो. लवकरच तुमच्या इन्शुरन्स पॉलिसी डिमॅट स्वरुपात येणार आहेत. आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड, गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र आता डिजिटल लॉकरमध्ये आपण जतन करुन ठेवतो. त्याचप्रकारे सोने सुद्धा डिजिटल स्वरुपात 2011 नंतर मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली. सरकारने सोव्हेरीन गोल्ड बाँड व्यवहारात आणले तेव्हा मोठा फरक पडला. या बाँडना केंद्र सरकारचे रिझर्व बँकेच्या माध्यमातून संरक्षण प्राप्त आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष सोन्यामध्ये गुंतवणुकीऐवजी आपल्याला अनेक पर्याय मिळालेले आहेत. ज्याप्रमाणे आपण इन्शुरन्स आणि गुंतवणूक या दोन गोष्टींची सरमिसळ करत नाही त्याचप्रमाणे सोन्याची किंवा दागिन्यांची हौस आणि सोन्यामधील गुंतवणूक आपल्याला वेगळी ठेवायला हवी."
डिजिटल सोन्यातील गुंतवणुकीचे प्रकार आणि फायदे थोडक्यात जाणून घेऊया.
- पहिला फायदा म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे सोव्हेरीन गोल्ड बाँड, ज्यामध्ये आपण अगदी एक ग्रॅम सोनं खरेदी करु शकतो आणि त्यावर वार्षिक अडीच टक्के व्याजही कमवू शकतो.
- वर्षानुवर्षे आपल्या तिजोरीमध्ये पडलेल्या सोन्याने आपल्याला मूल्यवृद्धी शिवाय इतर कोणताच फायदा दिला नाही. परंतु आता तेच सोनं डिजिटल स्वरुपामध्ये आल्यामुळे आपल्याला वार्षिक अडीच टक्के व्याज मिळू शकते किंवा खाजगी कंपनीमार्फत आणखी जास्त व्याज सुद्धा मिळू शकेल. शिवाय हे सोने तुम्ही अगदी केव्हाही खरेदी किंवा विक्री करु शकता, यामध्ये कोणतीही घट येत नाही. प्रत्यक्ष सोन्यामध्ये प्रत्येक वेळेला द्यावा लागणारा जीएसटी सुद्धा येथे नाही आणि विक्री करताना येणारी घटही नाही. या फार चांगल्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.
- यानंतर डिमॅट स्वरुपात किंवा डिजिटल स्वरुपात आपण अगदी 50 रुपयाचे सुद्धा सोने घेऊ शकतो. शेअर बाजारांमध्ये गोल्डन बीज तर म्युच्युअल फंडामध्ये गोल्ड ईपीएफच्या माध्यमातून अगदी कमी मूल्याचे सुद्धा सोने घेता येते आणि त्याची त्वरित विक्रीही करता येते.
"याविषयी अधिक माहिती घेऊन आपण कमोडीटी मार्केटमध्ये अगदी कमी रकमेमध्ये मोठी गुंतवणूक करु शकतो. त्यासाठी आपल्या शेअर्स ब्रोकरचा सल्ला जरुर घ्या," असं महेंद्र लुनिया यांनी नमूद केलं.