देशातील सर्वात मोठ्या LIC IPO चं आज स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टिंग; गुंतवणूकदारांचं लक्ष
LIC IPO : एलआयसीचा आयपीओ आज शेअर बाजारात येणार असून देशातल्या सर्वात मोठ्या आयपीओचं आज स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टिंग होणार आहे.
LIC IPO : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (Life Insurance Corporation of India) शेअर्सची लिस्टिंग आज देशांतर्गत शेअर बाजारात होणार आहे. देशातल्या सर्वात मोठ्या आयपीओचं आज स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टिंग होणार आहे. त्यामुळे आज संपूर्ण देशभरातील गुंतवणूकदारांचं लक्ष शेअर मार्केटवर असणार आहे. दरम्यान, एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) विक्रमी सहा दिवस बोलीसाठी खुला होता. एलआयसीच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभला. मागील आठवड्यात एलआयसी आयपीओचे वाटप करण्यात आलं.
LIC च्या IPO मधून सरकारनं उभे केले 21,000 कोटी रुपये
LIC IPO मधून 20,557 कोटी रुपये उभारण्यात सरकारला यश आलं आहे. तसेच, अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, एलआयसीच्या शेअरची लिस्टिंग होणार आहे म्हणजेच सामान्य जनतेसाठी उपलब्ध होणार आहे. ज्यांना IPO मध्ये LIC चे शेअर्स मिळाले नाही ते ही आज पासून शेअर्स विकत घेऊ शकणार आहे.
शेअर्सच्या लिस्टिंग योग्यरित्या झाली नाही तर गुंतवणूकदारांनी काय करावं?
शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून झालेली पडझड पाहता, आयपीओची सुरुवात संथ होण्याची भीती बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दरम्यान, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, गुंतवणूकदार आणि भागधारकांनी घाबरू नये आणि त्यांनी मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी एलआयसीचे शेअर्स होल्ड करावेत.
949 इश्यू प्राइज
सरकारनं एलआयसीच्या शेअर्सची इश्यू प्राइज 949 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना 889 रुपयांनी शेअर्स मिळाले आहेत. आज, 17 मे रोजी बीएसई आणि एनएसईवर शेअर्स लिस्ट केले जातील. LIC चा IPO 9 मे रोजी बंद झाला आणि त्याचे शेअर्सचं 12 मे रोजी बोलीदारांना वाटप करण्यात आलं. सरकारनं IPO द्वारे LIC मध्ये 22.13 कोटींपेक्षा जास्त शेअर्स म्हणजेच, 3.5 टक्के स्टेक ऑफर केले आहेत. यासाठी, किंमत श्रेणी 902-949 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती.
एलआयसी होणार देशातील पाचवी मोठी कंपनी
उद्या एलआयसी शेअर बाजारात डिस्काउंटमध्येही लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य (मार्केट कॅप) 6 लाख कोटींहून अधिक राहण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास, एलआयसी ही शेअर बाजारात लिस्ट होणारी भारतातील पाचवी मोठी कंपनी ठरणार आहे. बाजार भांडवल दराच्या मूल्यानुसार, सध्या एलआयसीपेक्षा रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांचे बाजार भांडवल अधिक आहे.