Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
Infosys Jobs : देशातील मोठी आयटी कंपनी इन्फोसिसनं तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. यानंतर नोकरभरतीबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
बंगळुरु : भारतातील आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसनं तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. इन्फोसिसनं तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. इन्फोसिसचा तिसऱ्या तिमाहीतील महसूल 41764 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 तुलनेत इन्फोसिसच्या नफ्यात तिसऱ्या तिमाहीत 11.46 टक्क्यांची वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर इन्फोसिसकडून येत्या आर्थिक वर्षात 20 हजार जणांना नोकऱ्या देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
इन्फोसिसनं तिसऱ्या तिमाहीच्या म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान 5591 जणांना नव्यानं नोकरी दिली आहे. सध्या इन्फोसिसमधील कर्मचाऱ्यांची संख्या 3 लाख 23 हजार 379 रुपये झाली आहे. कंपनीनं सलग दुसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या आकडेवारीत वाढ नोंदवली आहे.
इन्फोसिसनं येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2025-26 मध्ये 20 हजार फ्रेशर्सना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनी 15 ते 20 देईल अशी शक्यता आहे. इन्फोसिसचे सीएफओ जयेश संघराजका यांनी म्हटलं की आम्ही चालू आर्थिक वर्षात फ्रेशर्सच्या भरतीसाठी मनुष्यबळाचा आढावा घेत आहोत. या आर्थिक वर्षात 15 हजारांपेक्षा जास्त फ्रेशर्सना नोकरी दिली जाईल, असं ते म्हणाले. तर, येत्या आर्थिक वर्षात ती संख्या 20 हजारांपर्यंत असेल असं ते म्हणाले.
इन्फोसिसनं आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 11900 जणांना नोकरी दिली होती. त्यापूर्वीच्या म्हणजेच 2022-23 मध्ये 50000 फ्रेशर्सना कंपनीत भरती करुन घेण्यात आलं होतं. जयेश संघराजका यांनी पगारवाढी संदर्भात बोलताना ज्युनिअर लेव्हलच्या कर्मचाऱ्यांसाठी ती 1 जानेवारीपासून लागू होईल.वरिष्ठ लेव्हलच्या अधिकाऱ्यांसाठी ती 1 एप्रिलपासून लागू होईल, असं जयेश संघराजका म्हणाले. 6-8 टक्के वेतनवाढीची शक्यता नोंदवण्यात आली आहे.इन्फोसिनं त्यांना अपेक्षित असलेल्या फायद्यापेक्षा अधिका फायदा तिसऱ्या तिमाहीत मिळवला आहे. कंपनीचा यूरोप आणि अमेरिकेतली व्यवसाय देखील चांगल्या प्रकारे नफा मिळवून देत आहे.
दुसरीकडे टाटा कन्सलटन्सीमध्ये तिसऱ्या तिमाहीत 5370 कर्मचाऱ्यांची घट झाली आहे. एचसीएल टेकनं 2134 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.
दरम्यान, भारतीय शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर आज घसरला आहे. आज जवळपास 105 रुपयांची घसरण इन्फोसिसच्या शेअरमध्ये पाहायला मिळाली.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)