(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Import Export Data: मे महिन्यात व्यापारात 22.12 अब्ज डॉलरची तूट; निर्यातीत 10 टक्क्यांची घट
India Import Export Data: भारताच्या व्यापार तुटीत वाढ झाली आहे. मे महिन्यात व्यापारात 22.12 अब्ज डॉलरची तूट दिसून आली आहे.
India Trade Data: मे महिन्यात देशाची व्यापार तूट वाढली आहे. मे महिन्यात व्यापार तूट (Trade Deficit) ही 22.12 अब्ज डॉलर इतकी नोंदवण्यात आली. तर, एप्रिल महिन्यात (April 2023) ही तूट 15.247 अब्ज डॉलर इतकी होती. डिसेंबर 2022 नंतर आता मे 2023 मध्ये ही सर्वाधिक व्यापारी तूट ( India trade deficit)आहे. मागील पाच महिन्यात ही सर्वाधिक तूट आहे. डिसेंबर 2022 मध्ये व्यापार तूट ही 23.76 अब्ज डॉलर इतकी होती. तर, मागील वर्षी मे 2022 मध्ये व्यापारी तूट ही 24.29 अब्ज डॉलर इतकी नोंदवण्यात आली.
मे 2023 मध्ये आयातीत 6.6 टक्क्यांची घट झाली असून 57.1 अब्ज डॉलर इतका व्यापार झाला. तर, निर्यातीत 10.3 टक्क्यांची घट झाली असून 34.98 अब्ज डॉलर इतका व्यापार झाला. एप्रिल महिन्यात निर्यात व्यापार हा 34.66 अब्ज डॉलर इतका होता. याचाच अर्थ एप्रिल महिन्याच्या तुलनेत निर्यातीत वाढ असल्याचे दिसून आले.
वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सांगितले की, जागतिक व्यापारातील अडचणी कायम आहेत. वाणिज्य मंत्रालय आणि DPIIT (DPIIT) निर्यात वाढविण्याच्या धोरणावर काम करत आहे आणि 40 देशांवर विशेष लक्ष केंद्रीत करत आहे.
वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सेवांची निर्यात देखील जोडल्यास मे 2023 मध्ये एकूण निर्यात 60.29 अब्ज डॉलर झाली आहे. मागील वर्षी, मे 2022 महिन्यात 64.13 अब्ज डॉलर इतकी होती. सेवांसह, मे 2023 मध्ये 70.64 अब्ज डॉलरची आयात झाली आहे, जी एका वर्षापूर्वी मे 2022 मध्ये 76.32 अब्ज डॉलर होती.
सेवांच्या निर्यातीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मे महिन्यात सेवा निर्यातीचे मूल्य 25.30 अब्ज डॉलर इतके होते. मे 2022 मध्ये 25.13 अब्ज डॉलर इतके होते. सेवांची आयात मे 2023 मध्ये 13.53 अब्ज डॉलर इतकी होती. मे 2022 मध्ये 15.20 अब्ज डॉलर होती. सेवा आणि वस्तू एकत्र केल्यास मे 2023 मध्ये व्यापार तूट 10.35 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. एका वर्षापूर्वी हा आकडा 12.20 अब्ज डॉलर इतका होता.
आकडेवारीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत मे महिन्यात 73.96 टक्क्यांची उसळण दिसून आली आहे. तर, या महिन्यात एकूण 2.42 अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. मे 2022 मध्ये 1.39 अब्ज डॉलर इतकी निर्यात झाली होती. व्यापारातील तूट वाढल्यास त्याचा परिणाम परकीय गंगाजळीवरदेखील होतो. त्यामुळे आयात-निर्यातीतमधील तूट अधिक नसावी याकडे सरकार प्रयत्नशीस असते.