Indian Railway : ऑनलाईन तिकीट बुकिंच्या नियमात मोठे बदल होणार, 'या' यूजर्सला प्राधान्य मिळणार, 1 ऑक्टोबरपासून नवे नियम लागू होणार
Railway Ticket Booking : ऑनलाईन तिकीट बुकिंग संदर्भात आणखी एक बदल आयआरसीटीसीकडून केला जाणार आहे. यापूर्वी तात्काळ तिकीट बुकिंग संदर्भातील नियम बदलण्यात आले होते.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेनं ऑनलाईन तिकीट बुकिंग मध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. 1 ऑक्टोबर 2025 पासून रिझर्व्हेशन सुरु झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांमध्ये तेच यूजर्स ऑनलाईन तिकीट बुकिंग करु शकतात ज्यांचं आधार वेरिफिकेशन झालेलं आहे. हा नियम आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि मोबाईल ॲपसाठी लागू असेल.
रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलणार (Railway Ticket Booking Rule)
रेल्वेनं 1 जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार वेरिफिकेशन आवश्यक केलं होतं. आता रेल्वेचं तिकीट आरक्षित करण्यासाठी आधार वेरिफिकेशन आवश्यक केलं आहे. रेल्वेचा हा निर्णय तिकीट बुकिंग सुरु झाल्यानंतर सामान्य प्रवाशांना तिकीट बुक करता यावं यासाठी करण्यात आलं आहे. काही एजंट तिकीट बुकिंग सुरु झाल्यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीनं तिकीट बुक करतात. ज्यामुळं सामान्य यूजर्स किंवा प्रवाशांना तिकीट बुक करता येत नाही. आता आधार वेरिफिकेशनमुळं प्रवासी तिकीट बुक करु शकेल.
रेल्वेच्या रिझर्व्हेशन काऊंटरवरील तिकीट बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्याप्रमाणं रेल्वे तिकीट बुकिंग सुरु झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटात रेल्वेचे अधिकृत एजंट बुकिंग करु शकणार नाहीत. म्हणजे 15 मिनिटं आधार वेरिफाय यूजर्स आणि त्यानंतर 10 मिनिटांपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना एजंटांपेक्षा प्राधान्य मिळेल.
रेल्वेनं सेंटर फॉर रेल्वे इन्फॉरमेशन सिस्टीम्स आणि आयआरसीटीसीला तांत्रिक बदल करण्याचे आदेश दिले आहेत. यासह प्रवाशांना नव्या नियमांची माहिती देण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयानं याबाबत परिपत्रक सर्व विभागांना पाठवलं आहे.
रेल्वेनं घेतलेल्या या निर्णयामुळं ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता वाढेल. ज्या यूजर्सला एजंटस मुळं कन्फर्म तिकीट मुळत नाही त्यांना दिलासा मिळणार आहे. आधार लिंकिंगमुळं प्रवाशांना सुरुवातीच्या वेळेत तिकीट बुक करता येईल. यामुळं ई-तिकिटिंग सुरक्षित होईल.
आयआरसीटीसीनं रेल्वे तिकीट बुकिंग संदर्भात केलेल्या बदलांचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना होणार आहे. आयआरसीटीसीनं काही दिवसांपूर्वी तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले होते. तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार वेरिफिकेशन आवश्यक करण्यात आलं होतं. आयआरसीटीनं 1 जुलैपासून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार वेरिफेकशन आवश्यक केलं होतं. आधार वेरिफिकेशन ज्यांनी केलं त्यांनाच तात्काळ तिकीट बुक करता येते. यामुळं तात्काळ तिकीट प्रवाशांना उपलब्ध होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता रेल्वेनं आधार वेरिफिकेशनची व्याप्ती वाढण्याचा निर्णय घेतला आहे.
From October 1, 2025, the Railway Board will allow only Aadhaar-authenticated users to book general reservations through the IRCTC website or app during the first 15 minutes after booking opens for any train. Currently, this restriction applies only to Tatkal bookings. pic.twitter.com/mHUUBD56mP
— Press Trust of India (@PTI_News) September 15, 2025

























